चौंडी (जामखेड), ६ मे २०२५:
आज दिनांक ०६ मे २०२५ रोजी चौंडी (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या ऐतिहासिक बैठकीत सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मंजुळे आणि चित्रपट निर्माते व पत्रकार रमेश जेठे (सर) यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीच्या आधी दोघांनीही अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मभूमी चौंडी येथील स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केले.
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी याच चौंडी गावात झाला. त्या केवळ एक राणी नव्हत्या, तर एक समाजसुधारक, प्रशासनतज्ज्ञ व जनकल्याणाची प्रतीक होत्या. होळकर घराण्याच्या नेतृत्वाची जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वीकारली व अनेक लोकोपयोगी कामांद्वारे त्यांनी आपले नाव इतिहासात अजरामर केले. त्यांनी काशी, गया, सोमनाथ, रामेश्वर, हरिद्वार यांसारख्या तीर्थक्षेत्री मंदिरे, धर्मशाळा आणि घाट बांधले. त्यांच्या काळातील प्रशासन आजही आदर्श मानले जाते.
आजच्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत ग्रामीण विकास, शिक्षण, महिला सबलीकरण व सामाजिक समावेशावर चर्चा झाली. रामचंद्र मंजुळे यांनी ग्रामीण जीवनाचे वास्तव दाखवणाऱ्या त्यांच्या कलाकृतींचा अनुभव शेअर केला, तर रमेश जेठे (सर) यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अडचणी, शिक्षकांची भूमिका व नवोन्मेषी शैक्षणिक उपक्रम यावर मते मांडली.
स्मृतीस्थळावर झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी अहिल्याबाईंच्या कार्याची आठवण करून दिली व त्यातून प्रेरणा घेऊन आधुनिक महाराष्ट्रासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. गावकऱ्यांनीही या भेटीत विशेष सहकार्य केले.
अहिल्याबाईंच्या जीवनकार्याचा आदर्श समोर ठेवत, या दोघांनीही सामाजिक बदलासाठी समर्पित राहण्याची ग्वाही दिली. चौंडी गावासाठी ही भेट ऐतिहासिक ठरली असून, यामुळे गावाच्या विकासाला आणि अहिल्याबाईंच्या कार्याच्या पुनःस्मरणाला नवे बळ मिळाले आहे.