पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व हेड कॉन्स्टेबल विजय पाटील यांची धाडसी मोहिम; तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने कारवाई यशस्वी.
जळगाव : शहरातील जिल्हापेठ, रामानंद नगर व तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये तपास करीत असताना पोलिसांना मोठे यश मिळाले. या प्रकरणातील आरोपी राजस्थान राज्यातील सांचोर तालुक्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व हेडकॉन्स्टेबल विजय पाटील यांनी तत्काळ तिकडे प्रयाण केले.
सांचोर हे ठिकाण वालुकामय आणि विरळ लोकवस्तीचे असून, चोरीला गेलेली वाहने तसेच अन्य चोरटे शोधण्यासाठी पोलिसांनी मोठी तयारी केली होती. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग व गुप्त माहिती यांच्या आधारे या गुन्ह्याचा तपास सखोल केला गेला.
या तपासात जळगाव पोलिसांनी टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा कार जंगलातून शोधून काढली. ही कार चोरीच्या गुन्ह्यात वापरली गेली होती. फोटो ओळखण्यासाठी फिर्यादीकडे पाठवले असता त्यांनी ती कार आपलीच असल्याचे ओळखले. पोलिसांनी मोठ्या सतर्कतेने त्या कारवर नियंत्रण मिळवले आणि आरोपींना राजस्थानहून जवळपास 1000 किमी अंतर पार करत थेट जळगाव येथे आणले.
या मोहिमेत पोलिस निरीक्षक बाबन आहाड यांच्या मार्गदर्शनाखाली शरद बागल, विजय पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो. ह. हिरालाल पाटील, पो. ह. विजय पाटील, चालक महेश सोमवंशी यांचा समावेश होता.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. राजस्थानमधील जालोर जिल्ह्याच्या पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून त्यांच्या इतर साथीदारांची माहितीही मिळवली असून पुढील तपास सुरू आहे.