अकोले प्रतिनिधी :
पालकांनी विश्वासाने मुलींना पाठवलेली आश्रमशाळा… शिक्षण, संस्कार आणि सुरक्षिततेचे ठिकाण समजली जाणारी संस्था… पण हाच विश्वास नरकात बदलला! अकोले तालुक्यातील तिरडे आश्रमशाळेत दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर दोन वर्षांपासून चाललेला लैंगिक छळ, विकृत वर्तन आणि मानसिक त्रासाचा थरकाप उडवणारा प्रकार अखेर समोर आला आहे.
शिक्षक भाऊराव राया धुपेकर, साफसफाई कामगार धांडे मामा, मुख्याध्यापिका कुलथे मॅडम आणि शिक्षिका गभाले मॅडम या चौघांविरुद्ध पोस्को कायदा व भारतीय दंड संहितेतील गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून धुपेकरला अटक झाली आहे.
दोन वर्षांची नरकयात्रा…
पीडित मुलगी आठवीत असताना शिक्षक धुपेकर हा नराधम तासिका संपल्यानंतर वर्गात यायचा. तो सतत मुलींशी बोलण्याचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा.
एकेदिवशी जेवणाची सुट्टी असताना मुलगी बाकावर बसली होती. धुपेकर आला आणि “काय करत आहेस?” असे विचारत तिच्या अंगाला हात लावण्याचा घृणास्पद प्रयत्न केला. मैत्रिणीला देखील “माझे पाठ खाजव, हात पाय दाब” अशा घाणेरड्या मागण्या केल्या.
हे सर्व घडत असताना मुलींनी धैर्य एकवटून मुख्याध्यापिकांकडे तक्रार केली. मात्र “तुम्हाला माझी शपथ आहे, घरी सांगू नका!” असे सांगत प्रकरण दाबण्यात आले आणि धुपेकरची फक्त बदली करण्यात आली.
धांडे मामाचा पाठलाग
नववीत गेल्यावर मुलींना वसतिगृहातही सुरक्षितता उरली नाही. साफसफाई कामगार धांडे मामा चक्क कपडे धुताना जवळ उभा राहत, मागे लागून विकृत हालचाली करीत होता.
मुख्याध्यापिकेची धमकी!
पुन्हा मुख्याध्यापिकांकडे तक्रार केल्यावर “घडलेला प्रकार बाहेर सांगितलात तर शाळेतून काढून टाकू!” अशी उघडी धमकी देण्यात आली. उलट शिक्षिका गभाले मुलींच्या नावाने चिडवून मानसिक त्रास देत राहिल्या.
मानसिक छळ सहन न होऊन अखेर…
दहावीत गेल्यानंतर मुलगी पूर्णपणे खचली. तिनेच शाळेच्या मोबाईलवरून आईला कॉल करून दोन वर्षांपासून घडत असलेला नरकप्रवास सांगितला. संतप्त पालक थेट पोलिसांकडे धावले आणि विकृत कारस्थानाचा भंडाफोड झाला.
पोलिस कारवाई
पालकांच्या तक्रारीवरून गु.र.नं. 362/2025 नुसार
- पोस्को कलम 8, 12, 17
- भारतीय दंड संहिता कलम 75(2)(4), 74, 351(2)
अंतर्गत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मुख्य आरोपी शिक्षक धुपेकर अटकेत असून, उर्वरित आरोपींवरही कारवाई सुरू आहे. तपास पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई खांडबहाले करत आहेत.
🔥 गावात संतापाचा ज्वालामुखी फुटला!
या प्रकारामुळे तिरडे गावात संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी नराधमांना तात्काळ कठोर शिक्षा देऊन इतर मुलींना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
👉 पालकांचा आक्रोश –
“शाळा जिथे मुलींचे रक्षण करायला पाहिजे, तिथेच नराधमांचं राज्य असेल तर आमच्या मुली कुठे सुरक्षित?”
⚠️ हा प्रकार केवळ एका शाळेपुरता मर्यादित नाही, तर आश्रमशाळांमधील प्रशासनाचा काळा चेहरा, बेपर्वाई आणि भ्रष्ट व्यवस्थेची भीषण वस्तुस्थिती उघड करणारा आहे.