अहिल्यानगर प्रतिनिधी :-
नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनोज वासूमल मोतियानी (वय ३४, रा. मारुती मंदिराजवळ, सावेडी, अहिल्यानगर) याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
📌 १७ आरोपींपर्यंत पोचली तपासाची साखळी
नगर अर्बन बँकेत तब्बल २९१ कोटी रुपयांचा अपहार झाल्याची गंभीर तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या शाखेच्या पथकाने सातत्याने तपास करून आतापर्यंत एकूण १७ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
⚖️ जामीन अर्ज फेटाळला; आरोपी शरण आला
मनोज मोतियानी या संशयित आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला. त्यामुळे मनोज मोतियानी न्यायालयात शरण आला. न्यायालयीन सुनावणीनंतर त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
🚨 आर्थिक गुन्हे शाखेचा तपास वेगात
नगर अर्बन बँक घोटाळ्यातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरूच असून, अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.