shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कसोटीत कुलदिप यादवला संधी हवीच !


                भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ जुलैपासून मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल. इंग्लंड संघ सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. हेडिंग्ले आणि लॉर्ड्स येथे सामने जिंकल्यानंतर बेन स्टोक्स आणि कंपनीचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याच वेळी, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडिया पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल. तथापि, भारतीय संघासाठी पुनरागमन सोपे नसेल, कारण त्यांचा सामना इंग्लंडविरुद्ध अशा मैदानावर होणार आहे जिथे भारताने कधीही कसोटी जिंकलेली नाही. भारताने अनेक महान कर्णधारांच्या नेतृत्वाखाली मँचेस्टरमध्ये कसोट्या खेळल्या पण जिंकू शकला नाही. आता गिलला इतिहास रचण्याची संधी आहे. त्याच्याकडे सुनिल गावस्कर आणि महेंद्रसिंग धोनी सारख्या कर्णधारांना मागे टाकण्याची संधी आहे.

                भारताने आतापर्यंत मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे एकूण नऊ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी इंग्लंडने चार कसोटी जिंकण्यात यश मिळवले आहे, तर पाच कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. पराभव आणि अनिर्णिततेची ही मालिका तोडण्याची टीम इंडियाकडे उत्तम संधी आहे आणि हा विजय मालिका मनोरंजक बनवेल. जर भारताने मँचेस्टरमध्ये २-२ अशी बरोबरी साधली तर इंग्लंडवर दबाव येईल. त्यानंतर ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हल येथे होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात सर्व काही निश्चित होईल. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे टीम इंडियाचा असाच विक्रम होता, परंतु गिलची टीम इतिहास रचण्यात यशस्वी झाली. आता पुन्हा एकदा भारतीय संघ मँचेस्टरमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. 

               गिलच्या नेतृत्वाखालील एक तरुण संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. दौऱ्यावर जाण्या आधीपासून कोणत्याही क्रिकेट पंडिताने या मालिकेसाठी भारताला फेव्हरीट धरले . नव्हते. तथापि, आतापर्यंतच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने आश्चर्यचकित केले आहे. त्याने अनुभवी इंग्लिश संघाला कडवी झुंज दिली आहे. हेडिंग्ले येथे एका सत्रातील चुकीमुळे पराभव झाला, तर लॉर्ड्स येथे चौथ्या डावात फलंदाजांच्या अपयशामुळे पराभव झाला. टीम इंडियामध्ये काही विभागांची कमतरता आहे आणि संघ व्यवस्थापन चौथ्या कसोटीपूर्वी ती दुरुस्त करू इच्छिते. भारताने आतापर्यंत मँचेस्टरमध्ये विजयानगरम (१९३६), नवाब पतौडी सीनियर (१९४६), विजय हजारे (१९५२), दत्ता गायकवाड ( १९५९), अजित वाडेकर (१९७१ व १९७४), सुनील गावस्कर (१९८२), मोहम्मद अझरुद्दीन (१९९२), आणि महेंद्र सिंह (२०१४) यांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. या मैदानावर कर्णधारपद भूषवणारा गिल हा नववा कर्णधार असेल. भारताने सन १९३६, १९४६, १९७१, १९८२ आणि १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे कसोटी सामने अनिर्णित ठेवले होते. तथापि, इंग्लंड संघाने १९५२, १९५९, १९७४ आणि २०१४ मध्ये विजय मिळवला.

                विद्यमान कसोटी मालिकेत १-२ ने पिछाडीवर असून भारतीय संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत एजबॅस्टन आणि लॉर्ड्स येथे तीन अष्टपैलू खेळाडू आणि तीन शुद्ध गोलंदाजांना खालच्या फळीच्या फलंदाजीला बळकटी देण्यासाठी मैदानात उतरवले आहे, ज्यावरही टीका होत आहे. तिसऱ्या सामन्यात २२ धावांनी झालेल्या पराभवानंतर संघात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतो. लॉर्ड्समध्ये वेगवान गोलंदाज आकाश दीपला तंदुरुस्तीचा त्रास होत असल्याचे दिसून आले. ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल आणि मनगटी फिरकी गोलंदाजांना त्यातून काही मदत मिळू शकेल असे मानले जाते. इंग्लंड संघाचा नियमित फिरकी गोलंदाज शोएब बशीर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघाने डॉसनला बोलावले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यात आतापर्यंत बाहेर असलेल्या मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी देऊ शकतो. पाच गोलंदाजांच्या योजनेत दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश असू शकतो. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचाही असा विश्वास आहे की सपाट खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल असू शकते. अशा परिस्थितीत भारत बुमराह आणि सिराजसह वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या तीन फिरकीपटूंना संधी देऊ शकतो. तथापि, तो म्हणाला की मँचेस्टरमधील हवामानाचा खेळावर परिणाम होऊ शकतो परंतु तो निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घ्यायचा आहे. 

                 कामाच्या ताणामुळे बुमराह उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच सामना खेळण्याची शक्यता आहे, त्यामुळे बुमराहला विश्रांती दिली तरी कुलदीपला दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरवता येईल. या आठवड्यात सराव सत्रादरम्यान अर्शदीप सिंगच्या हाताला दुखापत झाली. जर बुमराह मँचेस्टरमध्ये खेळला नसता तर अर्शदीपला घेता आले असते, पण आता ती शक्यताही कमी आहे. सुत्रांच्या माहितीनुसार संघाने अंशुल कंबोजला अर्शदीपचा कव्हर म्हणून बोलावले आहे. एजबॅस्टन येथील दुसऱ्या कसोटीत बुमराह खेळला नाही तेव्हा आकाशदीपची निवड करण्यात आली होती . तिसऱ्या कसोटीत बुमराह आला तेव्हा प्रसिद्ध कृष्णाला विश्रांती देण्यात आली. बुमराहने आतापर्यंत २१.०० च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या आहेत. 

                कुलदीपची ऑर्थोडॉक्स फिरकी आणि चेंडू दोन्ही बाजूंनी वळवण्याची क्षमता इंग्लंडच्या आक्रमक बॅजबॉल पद्धतीविरुद्ध ट्रम्प कार्ड ठरू शकते. त्याची गुगली इंग्लिश फलंदाजांसाठी समस्या निर्माण करू शकते. माजी भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज फारुख इंजिनियर, जो बराच काळ मँचेस्टरमध्ये राहतो, त्याला वाटते की कुलदीपला नितीश कुमार रेड्डीऐवजी अंतिम संघात संधी द्यावी.

                इंग्लंडविरुद्ध कुलदीपचा रेकॉर्ड उत्तम आहे. त्याने सहा कसोटी सामन्यांमध्ये २१ बळी घेतले आहेत, ज्यामध्ये गेल्या वर्षी धर्मशाळा कसोटीत ११२ धावांत सात बळींचा समावेश आहे. बेकेनहॅम काउंटी ग्राउंडवर भारतीय संघाच्या सराव सत्रादरम्यान ३० वर्षीय डावखुरा मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने करुण नायर आणि अभिमन्यू ईश्वरन यांना सुमारे एक तास गोलंदाजी केली. लीड्स, एजबॅस्टन आणि लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये कुलदीप संघाबाहेर होता. या सामन्यांमध्ये, दुसऱ्या फिरकी गोलंदाजाच्या भूमिकेत जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्राधान्य देण्यात आले. कुलदीपने फक्त नर्सरीच्या मैदानावर एकटाच सराव सुरू ठेवला. कुलदीपने मार्च २०१७ मध्ये धर्मशाळा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि आतापर्यंत फक्त १३ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने अनेक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. परदेश दौऱ्यांवरही, संघ व्यवस्थापन अनेकदा फक्त एकाच फिरकी गोलंदाजाची निवड करत असे, ज्यामध्ये जडेजा किंवा अश्विनला प्राधान्य दिले जात असे. त्याने आतापर्यंत परदेशात फक्त चार कसोटी सामने खेळले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये अश्विन निवृत्त झाल्यामुळे आणि जसप्रीत बुमराह तीनपेक्षा जास्त सामन्यांसाठी अनुपलब्ध नसल्याने, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये कुलदीपला स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा होती. परंतु ती मिळाली नाही, आता मात्र संघाची परिस्थिती बिकट असून कुलदिपला संधी देऊन संघ प्रबंधन आपल्या मागील चुका टाळू तर शकतोच पण संघाला बळकटी देण्याची संधी साधू शकतो.

@ डॉ.दत्ता विघावे                     
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२
close