एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल बाजार समितीचे माजी सभापती व माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. गेली चार दशके त्यांनी शहरातील सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सक्रिय सहकार्य दिले आहे.
शालिग्राम गायकवाड हे दलित समाजाचे प्रभावशाली नेतृत्व मानले जात असून त्यांनी स्वतः दलित वस्तीत राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचे कार्य सातत्याने केले आहे. विविध समाजघटकांच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.
गायकवाड यांच्या धार्मिक व सामाजिक योगदानाची दखल घेऊन पोलीस अधिक्षक डॉ. रेड्डी यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह अनेक अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.