shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"एरंडोलमध्ये 'घेऊ उंच भरारी यशाची' व 'वारी UPSC ची' उपक्रमांतर्गत प्रेरणादायी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न!"

"एरंडोलमध्ये 'घेऊ उंच भरारी यशाची' व 'वारी UPSC ची' उपक्रमांतर्गत प्रेरणादायी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न!"

एरंडोल प्रतिनिधी –स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरणा व दिशा देणारा "घेऊ उंच भरारी यशाची" आणि "वारी UPSC ची" उपक्रमांतर्गत भव्य मार्गदर्शन कार्यक्रम दि. २५ जुलै २०२५ रोजी दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालय, एरंडोल येथे यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले होते. प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण, शांत अभ्यास व संयम या मूल्यांची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षा ही कोणत्याही शाखेतील विद्यार्थी देऊ शकतो.

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. बालाजी पवार यांनी UPSC परीक्षेसाठी नियमित रियाज व प्रात्यक्षिक अभ्यासाचे महत्त्व विशद करताना लता मंगेशकर आणि चित्रकाराचे उदाहरण देऊन परीक्षेतील तयारीचा मूलमंत्र उलगडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब अमितजी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, “स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा, जिद्द व कठोर मेहनतीला पर्याय नाही. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते.”

प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. योगेश ललित पाटील (IRS, IRMS UPSC CSE 2024-25, AIR 811) यांनी UPSC परीक्षेचे टप्पे, अनुभव, तयारीची पद्धत यावर सखोल चर्चा केली. आमोदे, ता. यावल येथील या युवकाने शेतकरी कुटुंबातून यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्याचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला. त्यांनी स्पष्ट केले की, “कमीत कमी खर्चात, योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण अभ्यासातून UPSC मध्ये यशस्वी होता येते.”

दुसरे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. जयदीप पाटील यांनी खानदेशातील यशस्वी UPSC अधिकाऱ्यांची माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. “वाचन, व्यायाम, योग, आणि मानसिक ताकद यांचा समतोल साधला तर कोणतीही परीक्षा कठीण नाही,” असा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. अरविंद बडगुजर, क्रीडा संचालक प्रा. किशोर वाघ, समन्वयक मा. जगदीश पाटील, प्रा. डॉ. स्वाती शेलार, प्रा. डॉ. सोपान साळुंखे, प्रा. आत्माराम चिमकर, प्रा. डॉ. मीना काळे, प्रा. डॉ. हेमंत पाटील, प्रा. सुनील सजगणे, प्रा. महेंद्रकुमार शिरसाठ, प्रा. सुरज वसावे यांचा समावेश होता. याशिवाय मा. घनश्याम पाटील (शिवसेना - शिंदे गट), मा. महेंद्र पाटील, मा. वैभव पवार, मा. प्रभूराम राजपूत यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. रामा वानखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अतुल पाटील यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी निकिता बनसोडे, लक्ष्मी पाटील, पूनम ठाकूर, सिद्धार्थ खैरनार यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, UPSC सारख्या उच्चस्तरीय परीक्षा देण्यासाठी त्यांना निश्चितच नवी प्रेरणा मिळाली आहे.

close