मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी अठरावे कविसंमेलन रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. “मैत्री, देशभक्ती आणि मुक्त कविता” या त्रिसूत्री संकल्पनेवर आधारित या संमेलनात १६ निवडक कवींनी भावस्पर्शी कविता सादर करत रसिकांची मने जिंकली.
सायंकाळी ४:३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. नियोजनबद्ध, शिस्तबद्ध वातावरणात भावनांची मुक्त अभिव्यक्ती अनुभवता आली. “कविता म्हणजे अंतःकरणाचा आवाज” या भूमिकेचा प्रत्यय या मंचावर आला. संमेलनाचे आयोजन “मैत्रीचे धन”, “भारत माझा देश आहे!” आणि “अंतरंगातील कवितागंध” या तीन सत्रांमध्ये करण्यात आले होते. प्रथम सत्रात मैत्री या नात्याची निरपेक्षता, उबदारपणा आणि विश्वास रेखाटणाऱ्या कविता सादर झाल्या. दुसऱ्या सत्रात देशप्रेम, स्वातंत्र्यलढा आणि भारतीयत्वाच्या भावना असलेल्या रचना सादर झाल्या. शेवटच्या सत्रात वैयक्तिक अनुभव, सामाजिक भान आणि मुक्त अभिव्यक्ती यांचा मिलाफ असलेल्या कविता सादर करण्यात आल्या.
या कविसंमेलनात प्रकाश बागडे, डॉ. मानसी पाटील, धनंजय पाटील, किशोरी पाटील, विवेक जोशी, कल्पना मापूसकर, विक्रांत लाळे, उत्तम कुलकर्णी, वैभवी गावडे, आश्विनी म्हात्रे, रविंद्र पाटील, डॉ. अनुज केसरकर, गुरुदत्त वाकदेकर आणि सनी आडेकर या कवींनी आपल्या विविध शैलीतील रचना सादर केल्या. विशेष सादरीकरणात चंद्रकांत दढेकर यांनी डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या ‘मैत्री’विषयक लेखाचे भावपूर्ण अभिवाचन करत श्रोत्यांच्या मनाला स्पर्श केला.
कार्यक्रमाचे आस्वादक म्हणून दिलीप राणे आणि संध्या दढेकर यांनी प्रत्येक सादरीकरणाचा रसग्रहणपूर्वक आनंद घेतला आणि कवींना सकारात्मक अभिप्राय देत प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी कवींना प्रमाणपत्र देण्यात आले आणि एकत्रित छायाचित्राने या संमेलनाची स्मृती कायमस्वरूपी जपली गेली.
रसिकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद, सभागृहातील शिस्तबद्धता आणि कविता सादरीकरणाचा दर्जा यामुळे अठरावे संमेलन संस्मरणीय ठरले. संपूर्ण कार्यक्रमासाठी संयोजन, वेळेचे नियोजन आणि साहित्यिक वातावरण यांचे उत्तम सूत्रसंचालन केले गेले.
या यशस्वी संमेलनानंतर आयोजकांनी आगामी एकोणिसावे कविसंमेलन रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली असून, सदर कविसंमेलनाचे सविस्तर निवेदन लवकरच प्रसारित करण्यात येणार आहे. काव्यप्रेमींनी या संमेलनासाठी सज्ज राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कविसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनुज केसरकर, उत्तम कुलकर्णी, विक्रांत लाळे, रविंद्र पाटील, वैभवी गावडे, गुरुदत्त दिनकर वाकदेकर (संस्थापक अध्यक्ष – मराठी साहित्य व कला सेवा) आणि सनी आडेकर (सचिव – शोध आनंदाचा फाऊंडेशन) यांनी विशेष मेहनत घेतली. मैत्रीचा गहिवर, देशभक्तीचा अभिमान आणि अंतर्मनातील संवेदनांचा स्पर्श घडवणारे हे संमेलन कविता, कवी आणि रसिक यांच्यातील बंध अधिक दृढ करणारे ठरले.