पालघर : पालघर येथील मॅकलाॅईडस् या औषधी कंपनीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेरचे भूमिपुत्र व कंपनीचे विभाग प्रमुख इंजि. विवेक गवळी यांनी केले होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी इंदुमती जाखड यांनी वृक्षारोपणाच्या ह्या मोहिमेबद्दल कौतुक केले. वृक्षारोपण मोहिम ही मोहिम न राहता ती लोकचळवळ बनली तर ख-या अर्थाने शासनाची ही मोहिम यशस्वी होण्यासाठी वेळ लागणार नाही. निरोगी व आनंदी जीवनासाठी जल, जंगल, जमीन याचे संवर्धन व संगोपन गरजेचे असल्याचे सांगून पर्यावरण रक्षण व प्रदूषण लढ्यात प्रत्येक नागरिकाने सहभाग देण्याचे आवाहन या प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती जाखड यांनी बोलताना केले.
राज्य शासनाने वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे.मॅकलाॅईडस कंपनीने वृक्षारोपण मोहिम हाती घेतली आहे. शासनाने निश्चित केलेल्या सार्वजनिक मोकळ्या जागी व शासकीय कार्यालयाच्या मोकळ्या ठिकाणी , शाळा महाविद्यालये, उद्याने आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने पालघर येथील मॅकलाॅईडस या कंपनीकडून विविध प्रजातीचे ६०० वृक्ष व वनस्पतीचे वृक्षारोपण पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कंपनीचे मुख्य व्यवस्थापकासह सर्व कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी यावेळी वृक्षारोपण केले. पर्यावरणाबद्दल जागृकता निर्माण व्हावी, जिल्ह्याची नैसर्गिक सुबत्ता व सौदर्य टिकण्यास मदत होईल, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार सुंदर व आकर्षक ठिकाण बनून विविध पक्ष्यांसाठी अधिवास निर्माण होईल,हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरण संतुलन व प्रदुषण मुक्त पालघर करण्यासाठीचा हा वृक्षारोपणाचा उपक्रम मॅकलाॅईडस या औषधी कंपनीकडून राबविण्यात आला. संपूर्ण दिवसभरात ६०० वृक्षाची लागवड करण्यात आली. कंपनीचे विवेक गवळी यांच्यासह कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.