एरंडोल (प्रतिनिधी) :इतिहास, संस्कृती आणि वारशासाठी ओळखले जाणारे एरंडोल शहर आज दुर्दैवाने पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. शहराच्या हृदयातून वाहणारी अंजनी नदी ही सध्या गटारगंगेत परिवर्तीत झालेली असून, नदीतील दुर्गंधी, प्लास्टिकचा साठा, काटेरी झुडपे आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
शहरातील अनेक भागांतून कचरा थेट अंजनी नदीत टाकला जातो, त्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढत चालल्या आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चिखल, कचर्याचा सडा, आणि दुर्गंधीमुळे रोगराईने डोके वर काढले आहे. मात्र, यावर उपाययोजना करण्याऐवजी संबंधित यंत्रणा केवळ डोळे असून आंधळे असल्यासारखी वागत आहेत, अशी टीका स्थानिक नागरिक करत आहेत.
विशेष म्हणजे, नागरिकांच्या तक्रारी, वृत्तपत्रांमधील फोटो आणि प्रांताधिकार्यांचे आदेश असूनही, नगरपालिका प्रशासन आणि अंजनी नदीच्या देखरेखीच्या जबाबदारीतील अधिकारी गप्पच आहेत. नागरिकांनी विचारले आहे की, "प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगांव जिल्ह्यात आहेच ना? मग त्यांनी एरंडोलमध्ये कधीच पाहणी का केली नाही?"
आरोग्य विभागाची सार्वजनिक ठिकाणी फवारणी न करणे, कचऱ्याचा वेळेवर उचल न होणे, यामुळे डेंग्यू, मलेरिया, आणि इतर साथीचे रोग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी, नपाचे पदाधिकारी, आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी तातडीने अंजनी नदी स्वच्छतेची मोहीम राबवावी.