शहाजीनगरात ‘दिगंबरा’च्या निनादात दत्त जयंती जल्लोषात
इंदापूर (प्रतिनिधी):श्री दत्त देवस्थान, शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे दत्त जयंतीनिमित्त साजरा झालेला अखंड हरिनाम सप्ताह व गुरुचरित्र पारायण सोहळा यंदाच्या वर्षीही भक्तिभावाचा अद्भुत झंकार अनुभवत पार पडला. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या अखंड गजरात निघालेल्या पालखी सोहळ्याने,शहाजीनगर व रेडा गावच्या परिसराला भक्तीमय स्पंदन दिले. काल्याचे किर्तन,पारायणाची सांगता आणि महाप्रसादाच्या वाटपाने दत्त जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला.
गत २३ वर्षांपासून परंपरेने सुरू असलेला हरिनाम सप्ताह यंदाही किर्तन, भजन,प्रवचन,महापूजा,अन्नदान,गुरुचरित्र वाचन,हरिपाठ-जागर अशा विविध धार्मिक उपक्रमांनी मंगलमय झाला. देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड आणि नीलकंठ मोहिते यांच्या मार्गदर्शना खाली सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे पार पडले.
दत्त जन्मोत्सवाचे अवचित्य साधत दत्त जयंती दिवशी श्री.दत्तगुरूंची महापूजा (४ डिसेंबर)पहाटे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा,नारायणदास रामदास ट्रस्टच्या विश्वस्त वैशालीताई भरत शहा, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा व इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते श्रींची आणि संत गुलाब बाबा मूर्तीची महापूजा विधीवत पार पडली.
दुपारच्या प्रकारात बावडा,काटी लाखेवाडी,नीरा,नरसिंहपुर तसेच वालचंद नगर परिसरातील वीस भजनी मंडळांची
भजन सेवा झाली तर भजन संध्या
संत गुलाब बाबा भजनी मंडळाने दुपारी भजनरूपी भक्तिरसाची मेजवानी दिली.
दुपारी चार वाजता काल्याचे कीर्तन
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. नवनाथ महाराज माने यांनी दत्त जन्माचे काल्याचे किर्तन सादर करत भक्तांना आध्यात्मिक ऊर्जेने भारावून टाकले.तदनंतर दिगंबरा’च्या गजरात भव्य पालखी सोहळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या निनादात श्रींच्या पादुका पालखीत विराजमान करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पादुका विराजमान करण्याचा मान माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या महिला उपाध्यक्षा कोमलताई साळुंखे ढोबळे यांना प्राप्त झाला.
मंदिर परिसरातील पंचपरिक्रमा पूर्ण करत पालखी पुन्हा मंदिरात दाखल झाली.
यावेळी मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती या कार्यक्रमाला माजी शिक्षण मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या राज्य महिला उपाध्यक्षा कोमलताई साळुंखे ढोबळे,गुरुकुल गोखळी शिक्षण संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,बाजार समितीचे संचालक किरण बोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व हजारो भक्तांनी उपस्थिती लावून कार्यक्रम शोभून गेला.
सर्वांचे स्वागत देवस्थानचे प्रमुख नीलकंठ मोहिते यांनी केले.
** फोटो :
श्री दत्त देवस्थान,शहाजीनगर येथे महापूजा करताना कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा,शहा परिवाराचे प्रमुख मुकुंद शहा,इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा व मान्यवर.

