शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय पथकाला यश.
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या कान, नाक, घसा विभागातर्फे कानाच्या खराब झालेल्या हाडाच्या जागी कृत्रिम हाड प्रत्यारोपित करून रुग्णाला दिलासा देण्यात वैद्यकीय पथकाला यश मिळाले आहे. रुग्णाला ऐकू येणे शक्य झाले असून वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी कौतुक केले आहे.
जळगाव शहरातील पुरुष रुग्णाला ऐकू येण्यासाठी अडचणी येत होत्या. त्याने उपचार घेतले मात्र फरक पडत नव्हता. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील कान-नाक-घसा विभागात त्याने तपासणी केली असता त्याचे ऐकण्यामध्ये आवश्यक असलेले स्टेपिज हे शरीरामधील सर्वात सूक्ष्म असे हाड खराब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे लागणारी शस्त्रक्रिया तात्काळ करणे गरजेचे होते. त्यासाठी कान-नाक-घसा विभागाच्या पथकाने दिव्याटो या अत्याधुनिक सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने रुग्णाची शस्त्रक्रिया करून दिलासा दिला.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून हि शस्त्रक्रिया मोफत झाली. स्टेपिज हे शरीरामधील सर्वात सूक्ष्म असे खराब झालेले हाड काढून त्याजागी 'पिस्टन' हे एक कृत्रिम प्रत्यारोपित हाड टाकून यशस्वी शस्त्रक्रिया केली. याद्वारे रुग्णाना आता नॉर्मल ऐकायला येणे शक्य होणार आहे. कान नाक घसा विभागप्रमुख डॉ. राजश्री चोरपगार, सहयोगी प्रा. डॉ. अक्षय सरोदे, सहायक प्रा.डॉ.ललित राणे, डॉ. विनोद पवार यांनी शस्त्रक्रिया केली. तर बधिरीकरण शास्त्र विभागाचे सहकार्य लाभले. डिस्चार्ज दिल्यावर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख उपस्थित होते.