नंदिकेश्वर मंदिर परिसराची विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता
इंदापूर : निरवांगी ता. इंदापूर येथील नंदिकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी श्रावणमहिन्यात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या दरम्यान मंदिर परिसरात कचरा व अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास होत असल्यामुळे परिसर स्वच्छता करण्यासाठी विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब व श्री शंभू विद्यालय दगडवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मंदिर परिसर स्वच्छ केला.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंह रणसिंग आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरवांगी (इंदापूर) गावातील नंदिकेश्वर मंदिर परिसराच्या स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्याच आठवड्यात येथे भव्य यात्रा झाल्याने मंदिर परिसरात प्लास्टिक व ओला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. यावेळी विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम करून मंदिर परिसर एकदम स्वच्छ केला. हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या १४८ विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. यावेळी सरपंच रणजित रासकर, उपसरपंच रामदास रासकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा राजेंद्रकुमार डांगे, प्रा सुवर्णा बनसोडे, प्रा.विनायक शिंदे आणि राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्य प्रा अमर वाघमोडे, प्रा. सोमनाथ चव्हाण, प्रा.नितीन रूपनवर, प्रा.आकांक्षा मेटकरी, प्रा.महादेव माळवे, प्रा.अभिजीत शिंगाडे आणि शंभू महादेव विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बंडू सुळ, प्रविण भोसले, नाथा पारेकर उपस्थित होते.