shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विचारवंतांच्या मुलाखती समकालाची चिकित्सा करणारे पुस्तक - प्रा.शिरीष लांडगे

संवादक सुभाष थोरात यांचे विचारवंतांच्या मुलाखती या पुस्तकाचे लोकार्पण संपन्न 

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
विचारवंताच्या मुलाखती हे समकालाची चिकित्सा करणारे पुस्तक आहे. वर्तमान काळाची लढाई विचारांची आहे. ती विचारांनीच लढावी लागेल त्यासाठी वैचारिक बळ देणारे हे पुस्तक आहे असे प्रतिपादन प्राचार्य शिरीष लांडगे यांनी केले. 
कॉम्रेड सुभाष थोरात यांनी घेतलेल्या मुलाखतींचे ‘विचारवंताच्या मुलाखती’ या राजीव देशपांडे आणि डॉ. श्रीधर पवार यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन अहिल्यानगरमध्ये झाले याप्रसंगी ते बोलत होते.

अहमदनगर महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी ‘विचारवंताच्या मुलाखती’ हे केवळ प्रश्नोत्तरांचे पुस्तक नव्हे तर सामाजिक चिंतन आणि सामाजिक परिवर्तनाचे मूल्यं असलेलं  हे पुस्तक आहे अशा भावना व्यक्त केल्या. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका डॉ.प्रतिभा अहिरे  होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्योत्तर काळाचे सिंहावलोकन करणारे हे पुस्तक आहे.या मुलाखतीतून  विचारवंतांचे आत्मकथन आलेले आहे. अकरा विचारवंतांनी विविध विषयासंदर्भात विवेचन केले आहे, त्यामुळे हे पुस्तक सामाजिक दस्तऐवज झाले आहे.आताच्या तरुणांना विचारांची दिशा देणारे हे पुस्तक आहे म्हणून तरुणांनी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे असे आवाहन केले. कॉम्रेड सुभाष थोरात यांच्या मृत्यू पश्चात हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यांच्या नंतरही त्यांचे हे काम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला.

 याप्रसंगी सुभाष वारे, कॉम्रेड सुबोध मोरे यांनी सहकारी व मित्र सुभाष थोरात यांच्या कार्यकर्ता व विचारवंत म्हणून जडणघडण संदर्भात विवेचन केले.
शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या विचार व मूल्यांशी तडजोड न करणारा विचारी मित्र आपण गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पुस्तकाचे संपादक राजीव देशपांडे यांनी प्रारंभी पुस्तक प्रकाशनामागील भूमिका विशद केली. प्रा. ग. प्र. प्रधान, डॉ. बाबा आढाव, प्रा. गो. पु. देशपांडे, डॉ. सुलभा ब्रम्हे, दया पवार, नारायण सुर्वे, प्रा. यशवंत मनोहर, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. विद्युत भागवत, प्रा. डॉ. महेबूब सय्यद आणि मनोहर कदम अशा एकूण ११ विचारवंतांचा मुलाखती या पुस्तकात आहेत. या सर्व पुरोगामी मंडळींची विचारवंत म्हणून झालेली जडणघडण आणि त्यातून जोपासलेले विचार एकत्रितपणे समोर यावेत ही भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक प्रा. मेहबूब सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोनाली देवढे-शिंदे यांनी केले तर आभार अशोक सब्बन यांनी मानले.
याप्रसंगी सुभाष थोरात यांच्या सहचारिणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे व त्यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार अबीद खान,अ.नगर

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close