shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डिजिटल शाळा- योग्य की अयोग्य ?

कोरोनाचा काळ हा सर्वांसाठी संकटाचा काळ होता. कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन मुळे अनेक बदल झालेले दिसून येतात. त्यातीलच एक बदल म्हणजे डिजिटल शिक्षण होय.वर्गातील फळा ते मोबाईल किंवा लॅपटॉपची स्क्रीन. असा तो प्रवास सर्वांनीच अनुभवला आहे. यातूनच पुढे डिजिटल शाळा उदयास आली असे म्हणायला हरकत नाही. 

        सध्या अनेक शाळांमध्ये शहरी भागात तरी असेच दिसून येत आहे की इंटरऍक्टिव्ह बोर्ड बसविण्यात आले आहेत. त्यामुळे डिजिटल शिक्षण ही संकल्पना पूर्णत्वास येऊ लागल्याचे आढळते.शाळांमधील डिजिटल बोर्डमुळे विद्यार्थी आनंदीत आहेत. कारण; त्यांना वेगवेगळ्या पद्धती अनुभवास मिळत आहेत. पाठ्यपुस्तकातील धडे मनोरंजनात्मक व प्रभावीपणे शिकण्यास मिळत आहेत. तसेच विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही विस्तृतपणे व नियोजनपूर्वक शिकविण्याचा आनंद मिळत आहे. खडूने लिहिण्यापेक्षा एका विशिष्ट प्रकारच्या पेनने किंवा हाताच्या बोटाने देखील डिजिटल बोर्डवर झटपट लिहून कमी वेळेत भरपूर ज्ञान देण्याचा व्यापक प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. 
     डिजिटल बोर्डमुळे मुलेही शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. ॲनिमेटेड व्हिडिओ धडे, कविता मन लावून पाहत आहेत व ऐकत आहेत. अधिक गोडीने लक्ष केंद्रित करून शिकण्यात रस दाखवत आहेत. खडूने लिहिलेला फळा पुसताना उडणाऱ्या धुळीमुळे होणारा त्रास कमी झाला आहे. खडूने लिहिलेले एकदा पुसले की पुसले जात असे तीच संकल्पना पुन्हा समजावून सांगण्यासाठी शिक्षकांना पुन्हा तेच तेच लिहावे लागत होते. पण; डिजिटल बोर्डमुळे एकदा लिहिलेले नंतर पहावयाचे असेल तर सेव्ह (जतन) करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने एक बटन दाबले की लगेच पाहिजे तो टॉपिक समोर उपलब्ध होत आहे.त्यामुळे कमी वेळेत हे साध्य होऊ शकत असल्याने वेळेची बचत होऊन मुलांना स्पष्टीकरण देण्यासाठी वेळ मिळत आहे.डिजिटल बोर्डचे हे फायदे असले तरी काही तोटेही असू शकतात. 
    डिजिटल बोर्ड साठी बऱ्याच वेळा इंटरनेटची आवश्यकता लागते आणि ते असणे गरजेचे आहे. डिजिटल उपकरणांच्या या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. त्यासाठी बोर्डवर लाईटची म्हणजेच डिस्प्ले ची ऍडजेस्टमेंट योग्य असणे आवश्यक आहे. नाहीतर डिजिटल बोर्डच्या वापरामुळे मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या डोकं दुखणे किंवा इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्यांबरोबरच आणखी काही समस्या म्हणजेच सर्वत्र शाळांमध्ये डिजिटल बोर्ड सर्व वर्ग खोल्यांमध्ये असतीलच असे नाही.डिजिटल बोर्ड साठीचा येणारा खर्च, वेळोवेळी बदलावे लागणारे सॉफ्टवेअर, त्याची निगा राखणे या सर्व गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.शाळेच्या वाढत्या गरजा आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच डिजिटल बोर्डचा वापर करणे योग्यतेचे ठरेल.

*लेखन
 " सुकन्या"
सौ.मिनल अमोल उनउने
सातारा - 9130470397

*लेख प्रसिद्ध सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close