एरंडोल – आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात नुकतीच राष्ट्रीयस्तरावरील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये देशभरातील एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून एरंडोलचे ॲड. किशोर काळकर, गडचिरोलीचे प्रकाश गेडाम आणि मेळघाटचे माजी महसूल आयुक्त रमेश मावस्कर यांची उपस्थिती विशेषत्वाने नोंदवण्यात आली.
केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीने झालेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्री जुएल ओराम, राज्यमंत्री दुर्गादास उईके, आणि सचिव राजेश गुप्ता यांच्यासह विविध राज्यांतील मान्यवर उपस्थित होते. बैठकीत शिक्षण, आरोग्य, सामाजिक व आर्थिक अडचणी, आणि वस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना यावर मंथन झाले.
केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ आदिवासी भागांपर्यंत पोहोचत नाही, याकडे लक्ष वेधून केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी अधिक कार्यक्षम अंमलबजावणीवर भर देण्याचे निर्देश दिले.
बैठकीनंतर उपस्थितांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेऊन समाजहिताच्या योजनांबाबत चर्चा केली.
एरंडोलचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. किशोर काळकर यांनी या राष्ट्रीय चर्चासत्रात मोलाची भूमिका बजावली, अशी माहिती दिली.