shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाबूजी हे विचारनिष्ठ, निःस्वार्थ, कृतिशील व्यक्तिमत्त्व होते – प्रा. प्रकाश जगताप यांचे गौरवोद्गार ..!

बाबूजी हे विचारनिष्ठ, निःस्वार्थ, कृतिशील व्यक्तिमत्त्व होते – प्रा. प्रकाश जगताप यांचे गौरवोद्गार

अकोले (प्रतिनिधी): “बाबूजी” म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅड. प्रेमानंदजी रुपवते हे वडिल दादासाहेब रुपवते यांच्या दाखवलेल्या विचारधारेवर निष्ठेने चालणारे, निःस्वार्थ, पारदर्शक आणि सुसंस्कारी नेतृत्व होते. त्यांच्यात राजकारणात यशस्वी होण्याची क्षमता असतानाही त्यांनी पद किंवा सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही,” असे गौरवोद्गार अकोले महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. प्रकाश जगताप यांनी व्यक्त केले.


अकोले तालुक्यातील बहुजन शिक्षण संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आंबेडकरी चळवळीचे अग्रणी आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य वाहिलेले अ‍ॅड. प्रेमानंदजी रुपवते यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त अकोले येथील ‘मार्गदाता विद्यार्थी वसतिगृहात’ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रकाश जगताप होते. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशराव देठे, बौद्ध महासभेचे तालुका संघटक रमेशराव शिरकांडे, वंचित बहुजन आघाडीचे गौतम देठे, आरिफ तांबोळी, बाळासाहेब वैराट, पोलीस पाटील बाळासाहेब पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबूजींना श्रद्धांजली अर्पण केली.

प्रा. जगताप म्हणाले, "बाबूजींनी वडिलांच्या काँग्रेस विचारसरणीला कधीही धोका दिला नाही. पक्ष बदलला असता तर त्यांना संसदेत स्थान मिळाले असते, परंतु त्यांनी निष्ठा सोडली नाही.”

कार्यक्रमात पुढे बोलताना कळसचे सरपंच राजेंद्र गवांदे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत “बाबूजींना लोकसभेची उमेदवारी न देऊन काँग्रेसने त्यांच्या राजकीय वाटचालीवर अन्याय केला” असा आरोप केला. तर भाजपाचे नेते भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, “बाबूजी जर शिवसेनेत गेले असते, तर नक्कीच खासदार झाले असते आणि आज मंत्रीपद भूषवले असते.”

कार्यक्रमात सरपंच सौ. सुमनताई जाधव, प्रा. स्वप्न साळवे, भाजपा सरचिटणीस वाकचौरे, सरपंच गवांदे आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलन करून करण्यात आली. बौद्धाचार्य राजू बबन देठे यांनी त्रिशरण आणि पंचशील विधी करून बौद्ध परंपरेनुसार पूजन विधी पार पाडला.

प्रास्ताविक लक्ष्मण आव्हाड सर यांनी तर सूत्रसंचालन कवी अशोकराव शिंदे यांनी केले. आभार वसतिगृहाचे अधीक्षक गोरक्षनाथ खरात यांनी मानले.

००००००

close