आग्रा – भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा येथे श्रीलंकेहून आलेल्या हिंदी शिक्षकांसाठी आयोजित रिफ्रेशर कोर्स अंतर्गत ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर डॉ. योगेश पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. डॉ. पाटील हे खोकरपाट (ता. अमळनेर) येथील रहिवासी असून ते विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानाचे संचालक डॉ. सुनील बाबुराव कुलकर्णी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हुकूमचंद मीना (हिंदी विभाग प्रमुख), आंतरराष्ट्रीय हिंदी विभागाचे डॉ. पुरुषोत्तम पाटील आणि संयोजक डॉ. रेणू चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. योगेश पाटील यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय ज्ञान परंपरेची वैशिष्ट्ये अत्यंत प्रभावीपणे मांडली. वेद, उपनिषदे, आयुर्वेद, योग, गणित, खगोलशास्त्र, न्यायशास्त्र, नीतिशास्त्र, संगीत, साहित्य, गुरुकुल आणि संत परंपरेचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या प्राचीन आणि समृद्ध ज्ञानसंपदेचे विवेचन केले.
"परंपरा ही भूतकाळातून चालत आलेली अशी गोष्ट असते जी वर्तमानाला आकार देते आणि भविष्य उज्ज्वल बनवते. जी गोष्ट आज कालबाह्य झाली आहे, ती परंपरा असू शकत नाही," असे सांगत त्यांनी भारतीय परंपरेतील मानवी मूल्ये आणि सहिष्णुतेचा वेध घेतला. तक्षशिला, नालंदा यांसारख्या प्राचीन शिक्षणसंस्थांची वैशिष्ट्ये विशद करताना त्यांनी आर्यभट्ट, भास्कराचार्य, चरक, सुश्रुत, पतंजली यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.
‘वसुधैव कुटुंबकम्’, ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या मूल्यांचा उल्लेख करत भारतीय तत्त्वज्ञानाचा जागतिक दृष्टिकोन त्यांनी उलगडून दाखवला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनील कुलकर्णी म्हणाले, “आज जग भारताच्या योग, आयुर्वेद आणि तत्त्वज्ञानाकडे आशेने पाहत आहे. त्यामुळे भारतीय ज्ञान परंपरेचा जागतिक स्तरावर प्रसार करणे ही काळाची गरज आहे.”
या व्याख्यानात श्रीलंकेहून आलेल्या हिंदी शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करत संस्थेच्या प्रशिक्षण उपक्रमाचे आणि हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले.
प्रास्ताविक डॉ. रेणू चौधरी यांनी केले. व्याख्यानास श्रीलंकेतील शिक्षक, संस्थानातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी भारतीय ज्ञान परंपरेबाबत नव्या दृष्टीने विचार करण्याची प्रेरणा घेतली.