‘ *तीमिरातून तेजाकडे’ लघुपटाला प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार*
इंदापूर : पळसदेव, दि. १३ : पुणे येथे आयोजित शॉर्ट फिल्म फेस्टीवलमध्ये ‘तीमिरातून तेजाकडे’ या लघुपटाने आपली वेगळी छाप पाडत प्रथम क्रमांक पटकावला. लेखक व दिग्दर्शक अमित काळे यांच्या या लघुपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म फर्स्ट प्राईज हा मानाचा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे,अरुण नलावडे, व अभिनेत्री देविका दफ्तदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या फेस्टिव्हलमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक तसेच प्रेरणादायी विषयांवर आधारित लघुपटांचे सादरीकरण झाले. त्यामध्ये अनेक दर्जेदार कलाकृतींच्या स्पर्धेत ‘तीमिरातून तेजाकडे’ या लघुपटाने आपले वेगळेपण सिद्ध करत विजेतेपद पटकावले.
या लघुपटातून बलात्कारासारख्या गुन्ह्यांविरोधात समाजाने मौन न बाळगता ठामपणे आवाज उठवणे आवश्यक असल्याचा ठळक संदेश देण्यात आला आहे. दोषींना कठोर शिक्षा झाल्यास अशा घटना रोखता येऊ शकतात, तसेच पीडितेला मानसिक आधार, वैद्यकीय उपचार व आत्मविश्वास परत मिळवून देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.
दिग्दर्शक अमित काळे यांनी सांगितले की, “संवेदनशील विषय हाताळताना प्रेक्षकांच्या मनाला भिडेल अशी मांडणी करणे हेच आमचे उद्दिष्ट होते. हा पुरस्कार आमच्या टीमच्या मेहनतीचे यश आहे.”
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अमित काळे आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, समाजाभिमुख लघुपट निर्मितीला यामुळे नवी दिशा मिळणार आहे.