एरंडोल (प्रतिनिधी)– एरंडोल शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचा विद्यार्थी अद्वैत मनोज मोरे याने आपली बुद्धिमत्ता व नेमक्या डावपेचांचा कस दाखवत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे त्याची पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, एरंडोल येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धेत अद्वैत मोरे, जो सध्या इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे, त्याने अत्यंत कौशल्यपूर्ण खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले.
या यशानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रसाद काबरे, उपाध्यक्षा पियुषा काबरे, मुख्याध्यापिका स्मिता घोरमोडे, शालेय अधीक्षक प्रशांत ढोले, क्रीडाशिक्षक आनंद जाधव तसेच सर्व शिक्षक व सहाध्यायींनी त्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद काबरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल नेहमीच वचनबद्ध आहे. शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हवे असलेले मार्गदर्शन, सुविधा व तज्ञ शिक्षक आमच्या शाळेत उपलब्ध आहेत. अद्वैत मोरे याचे यश हे त्याच परिश्रमांचे फलित आहे.”
अद्वैतच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून जिल्हास्तरीय स्पर्धेतही तो नक्कीच यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.