🔥
गड-किल्ले, बुरूज बांधले,
रस्ते, बोगदे खणून काढले,
तलाव, माती धरणं घडवलं,
लेण्या-जातं-वरवंटं कोरलं!
देव बनवला दगडातून,
स्वतः मात्र उपाशीच राहिलो हातात धूळ, पोटात पोकळी,
इतिहासात आम्ही आहोत की सावल्या?
🔥
किल्ल्यांच्या भिंती आमच्या रक्ताने रंगल्या,
दगडाखाली किती प्राण दबले ते कुणी मोजलं?
५० फूट दगडाखाणीत जीव गेला,
त्यावर कुणी स्मारक बांधलं का?
नेत्यांना फक्त मतांचा लालच,
वडारांचा घाम म्हणजे त्यांच्यासाठी फुकटचा खाराच!
🌪️
पालं टाकून गावकुसाबाहेर राहतो,
जागा मिळेपर्यंत ऊन, पाऊस, वारा सहन करतो!
मुलं उघडी नागडी रस्त्यावर भटकतात,
शिक्षणाचं नावही ऐकलेलं नाही…
भूक आणि अपमान यांच्या छायेत,
दारूच्या बाटलीत विसरतो स्वतःचं आयुष्य.
⚡
नेत्यांची सभा, महामेळावे,
सत्तेचे खेळ, घोषणांचे डोंगर,
पण आमच्या हातात फक्त आश्वासनांचे कागद!
७८ वर्षांचा खेळ बघतोय डोळे फाडून,
दर निवडणुकीत एकच जीआर,
त्याचंही करतात ढोलताशे वाजवून आगडोंब!
🌋
इतिहास आमच्याशिवाय लिहिलात का?
शिवरायांच्या किल्ल्यांवर आमचं रक्त सांडलंय,
आमच्या हातांनी कोरलेल्या देवांच्या पाया,
आमच्याच दुःखाच्या आक्रोशावर उभे आहेत!
आज आरक्षण नाही, घरकुल नाही,
फक्त अन्याय, अपमान, उपासमार यांची चावी!
🎵
"जागा हो रे वडारांनो,
तुमच्या रक्ताची कहाणी लिहा!
भीक मागू नका, हक्क घ्या,
तुमच्या हातांनी जग हादरवा!" 🎵
कवी रमेश जेठे सर
अहिल्यानगर

