shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारताचा झंझावाती दणका; पाकिस्तानचा धुव्वा उडवून सुपर ४ मध्ये दमदार एन्ट्री.

भारताचा झंझावाती दणका; पाकिस्तानचा धुव्वा उडवून सुपर ४ मध्ये दमदार एन्ट्री.

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)
: आशिया कप २०२५ च्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. या घणाघाती यशासह टीम इंडियाने सुपर ४ फेरीत दमदार एन्ट्री मारली आहे.

पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी घेतली खरी, पण भारतीय गोलंदाजांच्या आघाताने त्यांची सुरुवात डळमळीत झाली. पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने सॅम अयुबला शून्यावर बाद केले. लगेचच जसप्रीत बुमराहने मोहम्मद हारीसला (३) झटपट तंबूत धाडलं. फक्त दोन षटकांत दोन गडी गमावल्याने पाकिस्तान गडबडला आणि भारतीय चाहत्यांमध्ये जल्लोष उसळला.

थोडा प्रतिकार करताना फखर झमान (१७) आणि साहिबजादा फरहान (४०) यांनी ३९ धावांची भागीदारी केली. पण अक्षर पटेलने ८ व्या षटकात फखरला झेलबाद करून पुन्हा पाकिस्तानचा पाया हलवला. त्यानंतर कर्णधार सलमान अली आगा (३) यालाही त्याने तंबूत पाठवले. यानंतर कुलदीप यादवच्या फिरकी जादूने पाकिस्तानच्या फलंदाजांची घसरण अधिक वेगाने सुरू झाली. १३ व्या षटकात त्याने सलग दोन चेंडूंवर हसन नवाज आणि मोहम्मद नवाज यांना बाद केले, तर पुढच्याच षटकात सेट फलंदाज फरहानलाही (४०; ३ षटकार, १ चौकार) माघारी धाडलं.

वरुण चक्रवर्तीने फहीम अश्रफला (११) बाद करत पाकिस्तानच्या डावावर शेवटची शिक्कामोर्तब केली. निर्धारित २० षटकांत पाकिस्तानचा डाव ९ गडी गमावून केवळ १२७ धावांवर आटोपला.

भारतीय गोलंदाजांत कुलदीप यादवने ४ षटकांत फक्त १८ धावांत ३ गडी टिपले आणि सामनावीर ठरला. अक्षर पटेलने २, तर हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

१२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने तुफानी सुरुवात केली. अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात चौकार-षटकार ठोकत दमदार सूर लावला. त्याने ३१ धावा केल्या. शुबमन गिल १० धावांवर बाद झाला. पण सूर्यकुमार यादवने निर्धारपूर्वक फलंदाजी करत ४२ चेंडूत नाबाद ५३ धावा ठोकल्या. तिलक वर्मा (३१) सोबत त्याने ५६ धावांची भक्कम भागीदारी करून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. तिलक बाद झाल्यानंतर शिवम दुबे मैदानात आला आणि त्यानेही नाबाद राहून सूर्यकुमारला उत्तम साथ दिली.

भारताच्या डावाने शंभरी गाठली तेव्हा विजयासाठी फक्त २८ धावा हव्या होत्या. अखेर सूर्यकुमार आणि शिवम या जोडीने संयमी पण ठाम खेळ करत १६ व्या षटकात लक्ष्य गाठले. भारताने ३ गडी गमावून १२८ धावा करून पाकिस्तानवर ७ गडी राखून घणाघाती यश मिळवले.

यूएईनंतर पाकिस्तानवरही दमदार विजय मिळवून भारताने आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे. आता १९ फेब्रुवारीला दुबईत ओमानविरुद्ध टीम इंडिया उतरणार असून विजयी हॅटट्रिकची संधी साधण्यासाठी सज्ज आहे.

close