पुणे (प्रतिनिधी)
भटक्या-विमुक्त समाजांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी एक ऐतिहासिक मोर्चा १६ ऑक्टोबर २०२५ रोजी शनिवार वाडा, पुणे येथे काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने आज पुणे पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत या आंदोलनाची भूमिका, मागण्या आणि पुढील लढ्याचा आराखडा सविस्तर मांडण्यात आला.
या पत्रकार परिषदेत भटक्या-विमुक्त समाजांच्या ४२ जमातींचे अध्यक्ष एकत्र येऊन ‘एनटीडी फेडरेशन’ या संघटनेची स्थापना झाल्याची घोषणा करण्यात आली. या फेडरेशनच्या माध्यमातून सर्व समाजांच्या समस्या एकत्रितपणे मांडल्या जाणार आहेत.
मुख्य मागण्यांमध्ये —
1️⃣ कुणबी समाजाचा ओबीसी प्रवर्गात झालेला अंतर्भाव रद्द करावा, कारण यामुळे भटक्या-विमुक्त समाजांचे हक्क धोक्यात आले आहेत.
2️⃣ भटक्या-विमुक्त समाजांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी स्वतंत्र आयोग व आरक्षणाचा ठोस कायदा लागू करावा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप परदेशी, अध्यक्ष – महाराष्ट्र जोशी समाज समिती यांनी समाजबांधवांना आवाहन केले की,
“हा मोर्चा केवळ आंदोलन नाही, तर भटक्या-विमुक्तांच्या अस्तित्वाचा लढा आहे. प्रत्येक समाज बांधवाने १६ ऑक्टोबर रोजी शनिवार वाडा येथे उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करावा.”
या प्रसंगी लक्ष्मण माने (माजी आमदार), भरत विटकर (अभ्यासक), मच्छिंद्र चव्हाण (रिटायर्ड एसीपी), अॅड. रेखा माने, शिवलाल जाधव (ज्येष्ठ अभ्यासक व मार्गदर्शक), सिद्धू शिंदे (अध्यक्ष वैदु समाज), उर्मिला पवार (राजपूत भामटा समाज), सूर्यकांत चव्हाण (गोसावी समाज), मोहन शिंदे (नाथपंथी डवरी गोसावी समाज), अंबरनाथ इंगोले (सचिव, नाथपंथी डवरी समाज), रजनी पाचंगे (गोंधळी समाज), राणी जाधव (टकरी समाज) आणि इतर अनेक समाजांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत समाजातील तरुण, महिला आणि वरिष्ठ नेत्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. सर्व वक्त्यांनी एकमुखाने ठाम भूमिका घेतली की —
“कुणीही समाज मागे राहणार नाही, ४२ जमाती एकत्र येऊन इतिहास घडवणार!”
या पार्श्वभूमीवर पुण्यासह औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर येथे देखील असेच मोर्चे काढून सरकारपर्यंत भटक्या-विमुक्तांचा आवाज पोहचवला जाणार आहे.
📢 भटक्या-विमुक्त समाजाच्या हक्कांसाठीचा हा मोर्चा महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार आहे.
सर्व समाज बांधवांनी या लढ्याचा भाग बनून १६ ऑक्टोबरला शनिवार वाडा येथे हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.