जळगावात शासकीय रुग्णा लयामध्ये अस्थिव्यंगोपचार विभागाला यश.
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागातर्फे २ रुग्णांवर मोफत कृत्रिम सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. दोन्ही रुग्णांना अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
जळगाव शहरातील कांचन नगरचे रहिवासी सुरेश मधुकर सोनार (वय ७१) आणि लता काशीराम पाटील (वय ६०, रा. पिंपळगाव चौखांबे ता. जामनेर) या दोन रुग्णांना गुडघ्याचे सांधे घासले गेल्यामुळे चालण्यास प्रचंड त्रास होत होता. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता, शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर सुरेश सोनार यांच्या डाव्या गुडघ्याची तर लता पाटील यांच्या दोन्ही गुडघ्याची मोफत कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून या रुग्णांवर उपचार झाले. विशेष म्हणजे, लता पाटील यांच्या दोन्ही गुडघ्यांची एकाच वेळी शस्त्रक्रिया पार पडली, हे अस्थिव्यंगोपचार विभागाचे मोठे यश आहे. मंगळवारी दि. ७ रोजी दोन्ही रुग्णांना रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे हस्ते निरोप देण्यात आला. शस्त्रक्रियेसाठी अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी, सहयोगी प्रा. डॉ. राजेंद्र अग्रवाल, सहायक प्रा. पंकज घोगरे, सहा. प्रा. डॉ. सुमित पाटील, डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. नितीन प्रजापती, डॉ. यश बोन्डे, डॉ. विशाल टापरे, डॉ. हनुमंत काळे, डॉ. तौसिफ़ सय्यद, डॉ. अमोल कुऱ्हे, डॉ. साईनाथ जगताप आदींनी परिश्रम घेतले.