प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील पक्षांसोबत स्थानिक पातळीवरील युतीचा अंतिम निर्णय पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी दिली आहे. त्यांच्या या निर्णयानंतरच केज विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले जातील, असे मुंदडा यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे, जोपर्यंत पंकजाताई मुंडे यांचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा इच्छुकाने परस्पर महायुतीच्या नावाखाली उमेदवारी जाहीर करू नये, असे आवाहनही जेष्ठ भाजप नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.
स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करून महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा भाजपचा मानस आहे. त्यामुळे, मुंदडा यांच्या या वक्तव्यामुळे आता सर्व इच्छुकांना पंकजाताई मुंडे यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. केज मतदार संघातील निवडणुकीचे चित्र आता पंकजाताई मुंडे यांच्या निर्णयावर अवलंबून असेल.