अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांसाठी घेतला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-
१० ऑक्टोबर २०२५ रोजी आपला वाढदिवस असूनही, येथील पंचायत समिती सभापती विश्वनाथ घुले यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि अनुकरणीय निर्णय घेतला आहे. संपूर्ण बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे झालेले अतोनात नुकसान आणि त्यांच्यावरील संकट लक्षात घेता, त्यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
माजी सरपंच तसेच विद्यमान सभापती, श्री.विष्णु घुले यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे की, शेतकरी संकटात असताना कोणताही उत्सव साजरा करणे योग्य नाही. त्यांनी आपल्या सर्व हितचिंतकांना आणि कार्यकर्त्यांना विनम्र विनंती केली आहे की, कोणीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर, जाहिरात लावू नये किंवा पुष्पगुच्छ, शाल, हार घेऊन येऊ नये.
श्री.विष्णु घुले यांचा हा निर्णय समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा आहे. शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना नैतिक पाठिंबा देण्याची त्यांची भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे.