शिर्डीतील विजयादशमी पथसंचलन अविस्मरणीय!
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त शिर्डी येथे भव्य पथसंचलन आयोजित करण्यात आले. शुक्रवारी (१० ऑक्टोबर) पार पडलेल्या या पथसंचलनाचे स्वयंसेवकांबरोबरच स्थानिक ग्रामस्थांनीही उत्साहात स्वागत केले. गेली ५० वर्षांहून अधिक काळ विजयादशमी पथसंचलनाची शिर्डीतील परंपरा कायम आहे.
शताब्दी वर्षामुळे शिर्डी शहरातील स्वयंसेवक आणि समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पथसंचलन सायं. ५:०० वाजता श्रीरामनगर भागातून सुरू झाले व छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री साईबाबा मंदिर परिसर मार्गे सिल्वर ओक लॉन्स या मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचले. मार्गात नागरिक, माता-भगिनी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या सदस्यांनी पुष्पवृष्टी आणि सडा-रांगोळीद्वारे स्वागत केले.
मुख्य कार्यक्रमस्थळी विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी श्री. प्रतापराव जगताप, प्रमुख वक्ते श्री. विनयजी पत्राळे, माननीय जिल्हा संघचालक श्री. किशोरजी निर्मळ आणि माननीय तालुका संघचालक श्री. रावसाहेब काका गोंदकर यांच्या शुभहस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.
प्रमुख अतिथी श्री. प्रतापराव जगताप यांनी उपस्थित बाल, तरुण आणि प्रौढ स्वयंसेवकांचा उल्लेख करत संघाची साधना, उपासना आणि उपलब्धी हे तीन वयोगट असल्याचे सांगितले. यानंतर प्रमुख वक्ते श्री. विनयजी पत्राळे यांनी संघाच्या शताब्दीनिमित्त पूजनीय सरसंघचालकांनी सर्व स्वयंसेवक तसेच समाजाला दिलेल्या ‘पंच परिवर्तन बिंदू’चे विश्लेषण केले. सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वबोध आणि नागरिक कर्तव्य या मूल्यांचा अंगीकार केल्यास भारत देश जगाच्या केंद्रस्थानी राहील आणि विश्व शांती-कल्याणाचा मार्ग प्रशस्त होईल, असे त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.
या भव्य कार्यक्रमात शिर्डी उपखंडातून ६८७ तरुण, ५० बाल स्वयंसेवक, ६५ माता-भगिनी आणि ११५ बांधव उपस्थित होते.