३२ वर्षांची प्रतिक्षा ३५ गावांची तहान साकळाई जलसिंचन योजना..!
वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे):- बहुचर्चित साकळाई जलसिंचन योजना १९९० पासून २०२५ पर्यंत गेली ३५ वर्षे अखंड लढा देत असुन सुमारे ३५ वर्षापासून या योजनेची मागणी सातत्याने होत आहे.साकळाई उपसा जलसिंचन योजना मंजुरीच्या सप्टेंबर,आक्टोंबर २०२५ मध्ये अंतीम टप्यात होती.तसेच राज्य तांत्रिक सल्लागार समितीची बैठक अद्याप बाकी असून साकळाईच्या तांत्रिक अहवलाला मंजुरी मिळणे शिल्लक होते दिवाळीपुर्वी या योजनेचा श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न होता.ही योजना सुरवातीला कुकडीतून होणार होती.आता घोड धरणावरुन खर्च वाढवून करण्याचे निश्चित करण्यात आले होते.विशेष म्हणजे घोड खालील शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध न केल्याने सरकारला योजनेच्या तांत्रिक मंजुऱ्या आणि आराखडे तयार करताना कुठलीही अडचण आली नाही असे सांगितले गेले आहे.तसेच साकळाई उपसा सिंचन योजने अंतर्गत १२०० हेक्टर क्षेत्रास सिंचन व पिण्यासाठी १.८ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल.हे पाणी जूलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातच देण्यात यावे,असे प्रोजेक्ट अहवालात नमुद केल्याचे समजते.सदर पाणी घोड धरणातून प्रस्तावित करण्यात आले आहे.घोड प्रकल्पाचा महत्ताचे वार्षिक पाणीवापर व प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पाण्याची गरज लक्षात घेता हे पाणी घोड प्रकल्पाचे अस्तित्वातील वार्षिक पाणी वापराच्या तरतुदीतून भागवणे अशक्य असल्याने घोड धरणाचे फेर जलनियोजन करुन त्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे.असे सांगण्यात येत आहे.तसेच ही योजना तयार असून राज्य तांत्रिक सल्लागार समितीपुढे तो अहवाल ठेवण्यात आला आहे. समितीची बैठक झाल्यानंतर योजनेला अंतीम मंजुरी देवून प्रत्यक्षात दिवाळीपूर्वी भूमिपूजन करुन कामाला सुरुवात होणार असल्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते.मग अचानक या योजनेचे असे काय झाले?भूमीपूजनाची घोषणा केली ती फक्त आश्वासन होते का ? निवडणूका आल्यावरच साकळाई योजना आठवते का?असा प्रश्न योजनेतील समाविष्ट चिखली, कोरेगाव, कामठी, खांडगाव, महांडुळवाडी, कोळगाव, सुरेगाव, घुटेवाडी, कोथुळ, बांगर्डे व मांडवगण, बाबुर्डीबेंद, घोसपुरी, सारोळाकासार, खडकी, जाधववाडी, वाळकी, शिराढोण, हिवरेझरे, दहिगाव, साकत, वाटेफळ, देऊळगावसिद्धी, वडगाव तांदळी, तांदळी वडगाव, रुईछत्तीशी, गुणवडी, आंबीलवडी, मठपिंप्री, हातवळण, गुंडेगाव, राळेगण या लाभक्षेत्रातील जनतेला पडलेला प्रश्न आहे.
*साकळाई योजनेला शिरुर व श्रीगोंदा येथून विरोध का? कशासाठी?कोणी केला विरोध?*
साकळाई उपसा जलसिंचन योजना कुकडीच्या धरणावरून न होता आता घोड धरणावरून होत आहे.चौदाशे कोटींचे बिग बजेट असणारी ही योजना घोडच्या मुळावर तर येणार नाही ना? अशी भीती घोडच्या लाभधारक शेतकऱ्यांना वाटत आहे. साकळाई जलसिंचन योजना ही शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुखी संसारावर नांगर फिरवणारी आहे.ही योजना रद्द करण्यासाठी शासनाने फेरविचार करण्याचे आवाहन या भागातील शेतकऱ्यांनी केले आहे.अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा 'घोडधरण मूळ लाभार्थी बचाव समितीने' दिला आहे.
साकळाई योजना कुकडी अथवा विसापूर धरणावरून करणे संयुक्त होते. पण लोकसभा निवडणुकीनंतर ती घोड धरणावरून करण्याचे राजकारण झाल्याचा आरोप श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक पाटील भोसले यांनी केला. त्यांचा इशारा अप्रत्यक्षपणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होता.तसेच नागवडे सहकारी कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलताना कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले, साकळाई घोड धरणावरून करणे चुकीचे आहे. अगोदरच घोडचे पाणी MIDC ला जातेय त्यात पुन्हा हा नवा प्रकल्प घोडचे वाळवंट करणार आहे व या प्रश्नावर कुणीही बोलत नसून त्यामुळे अडचणी वाढत आहेत. या प्रकरणी तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी याबाबतची भूमिका स्पष्टपणे जाहीर करावी असे बोलून दाखवले असुन सदर साकळाई योजना राबवताना दोन्ही तालुक्यांतील किती शेतकऱ्यांना विचारात घेतले? शासनाने याविषयी हरकती मागविल्या का? जनजागृती केली का? पाटबंधारे खात्याने कोणत्या आधारावर सर्व्हेक्षण केले? या सगळ्या प्रश्नांचा विचार करता ही योजना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बळजबरीने बसवलेली योजना आहे.आमच्या जमिनी गेल्या आम्ही धरणग्रस्त झालो आहे त्या जमिनीवर आणि धरणातील पाण्यावर आमचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र साकळाई योजनेमुळे भविष्यातील पिढ्यांवर दुरगामी परिणाम होतील धरणासाठी शेती गेली आणि साकळाई जलसिंचन उपसा योजनेसाठी हक्काचे पाणी गेले तर आमची अवस्था तेलही गेले आणि तूपही गेले अशीच होणार आहे.तसेच या योजनेचे सर्व्हेक्षण कोणत्या आधारावर केले आहे.असा प्रश्न शिरूर तालुक्यातील चिंचणी, घोड तसेच श्रीगोंदा तालुक्यातील धरणाशी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा आहे.

