shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलांचा नवा विश्वविजेता भारतच ठरणार ?


               बहुचर्चित महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याने सर्वांच्या उत्सुकता शिगेला पोहचविल्या आहेत. जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणारे दोन संघ निश्चित झाले असून रविवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघांनी कधीही विश्वचषक जिंकलेला नसल्याने यावेळी महिला क्रिकेटला नवीन विजेता मिळणार हे निश्चित !

                 भारत आणि दक्षिण आफ्रिकेसाठी अंतिम फेरी गाठणे सोपे नव्हते, कारण दोन्ही संघांना उपांत्य फेरीत कठीण आव्हानांचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना इंग्लंडशी झाला, तर भारताचा सामना सात वेळा विजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाशी झाला. मनोरंजक म्हणजे, ज्याप्रमाणे इंग्लंडने गट टप्प्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाने गट टप्प्यात भारताला हरविले होते. तरीही, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत उपांत्य फेरीतील अडथळ्यावर मात केली आणि यशस्वीरित्या अंतिम फेरीत पोहोचले. आता, दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या विश्वचषक विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहेत.

                 सन २०२५ च्या महिला विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासाचा विचार करता, दोन्ही संघांनी गट टप्प्यात चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका सात सामन्यांतून पाच विजय आणि दोन पराभवांसह १० गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. तर यजमान भारत सात सामन्यांतून तीन विजय, तीन पराभव आणि एक अनिर्णित राहून सात गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला, त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचला.

                 भारताने पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात सह-यजमान श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव करून महिला विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर पुढच्या सामन्यात त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव केला. सलग दोन विजयांनंतर, भारताच्या मोहिमेला पराभवाच्या हॅट्रिकचे गालबोट लागले, तेंव्हा असे वाटत होते की, त्यांचा प्रवास साखळीतच संपतो का काय ? भारताचा पहिला पराभव त्याच दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून झाला ज्याच्याविरुद्ध जे रविवारी अंतिम सामना खेळणार आहेत. त्यानंतर त्यांना ऑस्ट्रेलियाकडून तीन विकेट्सने आणि इंग्लंडकडून चार धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकणे भारतासाठी महत्त्वाचे होते. दोन्ही संघांसाठी हा सामना अक्षरशः बाद फेरीचा सामना होता, परंतु स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांच्या शानदार खेळीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर मोठे लक्ष्य ठेवले आणि पावसाने व्यत्यय आणलेला सामना डीएलएस पद्धतीने ५३ धावांनी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा पुढील गट फेरीचा सामना बांगलादेशविरुद्ध होता, परंतु पावसामुळे सामना वाया गेला.

                  दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात निराशाजनक झाली, इंग्लंडविरुद्ध त्यांना १० गड्यांनी मोठा पराभव पत्करावा लागला. तथापि त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि सलग पाच सामने जिंकले. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला सहा गङ्यांनी, भारताला तीन विकेट्सने, बांगलादेशला तीन विकेट्सने, श्रीलंकेला १० विकेट्सने डीएलएस पद्धतीने आणि पाकिस्तानला १५० धावांनी पराभूत केले. तथापि, त्यांच्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात त्यांना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर संघाचे मनोबल अबाधित राहिले आणि त्यांनी उपांत्य फेरीत इंग्लंडला हरवताना अफलातून कामगिरी केली.

                   भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम फेरीत कधीही एकमेकांसमोर आलेले नाहीत. तथापि, महिला विश्वचषकात ते सहा वेळा एकमेकांशी भिडले आहेत. वनडे विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका बरोबरीत असून, त्यांनी प्रत्येकी तीन  विजय मिळविले आहेत. दोन्ही संघ पहिल्यांदा सन १९९७ मध्ये आमनेसामने आले होते, जिथे भारताने दक्षिण आफ्रिकेला पाच विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर सन २००० मध्ये भारताने आठ गडी राखून विजय मिळविला. त्यानंतर सन २००५ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा चार विकेट्सने पराभव केला.

                 सन १९९७ ते २००५ या काळात महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिकेचा तीन वेळा पराभव केला, तर सन २०१७ ते २०२५ दरम्यान तीन वेळा द. आफ्रिकेने भारताचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने २०१७ मध्ये भारताचा ११५ धावांनी आणि २०२२ मध्ये तीन विकेट्सने पराभव केला. विद्यमान स्पर्धेतही, दक्षिण आफ्रिकेने गट टप्प्यात भारताविरुद्ध विजय मिळविला.

                दोन्ही संघ कागदोपत्री तुल्यबळ असले तरी सदरचा अंतिम सामना टिम इंडियाला मायदेशात घरच्या प्रेक्षकांसमोर खेळायचे असल्याने त्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. शिवाय भारताने उपांत्य फेरीत बलाढ्य अशा सात वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला विश्वविक्रमी धावांचा पाठलाग करून हरविल्याने संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. स्मृती, जेमीमा, हरमन, रिचा, दिप्ती चांगल्याच फॉर्मात आहेत. परिस्थितीनुसार गोलंदाजही आपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडत आहेत. अंतिम सामन्यात या सर्वांनी आपले कर्तव्य इमानेइतबारे पार पाडले व त्यांना क्षेत्ररक्षकांनी योग्य साथ दिली तर भारतीय महिला संघ नक्कीच विश्वकरंडक उंचावेल. असे जर झाले तर पुरुष व महिला मिळून एका वर्षात तीन आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा अशक्य विश्वविक्रम भारताच्या नावे लागेल.

✍️ लेखक : डॉ. दत्ता विघावे 

        क्रिकेट समिक्षक 
 मो. क्रं - ९०९६३७२०८२..
close