श्रावण महिन्या इतकेच महत्व असणारा आणखी एक मराठी महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना होय. येत्या २१ नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरु होत आहे.
मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्याला " अग्रहायण " असेही म्हटले जाते. अग्रहायण म्हणजेच मुख्य महिना होय. तसेच या महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगशीर्ष नक्षत्राजवळ असतो म्हणून या महिन्याला अग्रहायण किंवा मार्गशीर्ष असे नाव पडले आहे.
या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो. त्यामुळे हवामान आल्हाददायक असे असते. तसेच स्वच्छ व सुंदर हवा सुखकर असते. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद् गीता सांगताना देखील मार्गशीर्ष महिन्याचा उल्लेख केलेला आढळतो.
या महिन्यात देव दीपावली, चंपा षष्ठी, मित्र सप्तमी, महानंदा नवमी, मोक्षदा एकादशी, दत्त जयंती, सफला एकादशी हे महत्त्वाचे दिवस असतात.
शुद्ध पंचमीला नागदिवे करून पुजा केली जाते. चंपाषष्ठी या दिवशी खंडोबाला वांग्याचे भरीत रोडगा व कांदा पात याचा नैवेद्य दाखविला जातो. दत्त जयंती हा उत्सव गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, पिठापुरम, गिरनार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच पंढरपूर जवळ गोपाळपूर या ठिकाणी विष्णूपद दर्शनासाठी व भोजन करण्यासाठी असंख्य भाविक याच महिन्यात येतात.
या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. घरातल्या सर्वांचं आरोग्य नीट राहावं तसेच घरात धनधान्य सुबत्ता राहावी याकरिता हे व्रत केले जाते. तसेच या व्रतामुळे घरात लक्ष्मी व विष्णूची कृपा राहते असे मानले जाते.
या महिन्याला " मगसर " किंवा " अगहन " असेही म्हटले जाते.
अनन्यसाधारण असे महत्त्व असणारा हा मार्गशीर्ष महिना आहे. चला.... तर मग सज्ज होऊया मार्गशीर्ष महिन्यातील सण साजरे करण्यासाठी.
*लेखन
सौ.मिनल अमोल उनउने (सातारा)
*लेख प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

