एरंडोल : एरंडोल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर SVEEP (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) कार्यक्रमां तर्गत मतदार जनजागृतीसाठी पथनाट्याद्वारे एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी एरंडोल नगरपरिषद आणि समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी या पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. बसस्थानक परिसर, म्हसावद नाका, बुधवार दरवाजा आणि जुनी नगरपालिका या ठिकाणी झालेल्या सादरीकरणाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पथनाट्याद्वारे नागरिकांना मतदानाचा हक्क, लोकशाहीतील त्याचे महत्व आणि शंभर टक्के मतदानाचे आवाहन प्रभावीपणे पोहोचविण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मा. श्री प्रदीप पाटील आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी, नगरपरिषद एरंडोल मा. श्री अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पथनाट्य यशस्वीतेसाठी स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री विवेक वैराळकर यांच्यासह श्री महेंद्र पाटील (सहाय्यक प्रकल्प अधिकारी), श्री सचिन पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी) आणि श्री दीपक बनसोडे (भूकर मापक) यांनी विशेष परिश्रम घेतले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होत शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन या निमित्ताने केले.


