shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयुष्यातले सांगाती ३९,गंगाधरराव फडणवीस,ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!



जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

आज ११ नोव्हेंबर २०२५. आज महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचे तीर्थरूप गंगाधरराव फडणवीस यांचा ३७ वा स्मृती दिवस आहे. गंगाधरराव हे देखील राजकीय क्षेत्रात सक्रिय नेते होते. विदर्भात आधीचा जुना जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्ष गावागावात पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते राजकारणी कमी आणि लोकसेवकच जास्त होते. त्याचबरोबर सर्वांना घेऊन चालणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्व होते. अनेक कुटुंबांमध्ये ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवून होते. त्यातलाच एक आमचा परिवार देखील होता. 

गंगाधररावांचा आणि माझा पहिला परिचय झाला, तो १९६९ साली. त्यावेळी मी नवव्या वर्गात शिकत होतो. माझ्या आठवणीनुसार त्यावेळी नागपूर महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. तत्कालीन जनसंघातर्फे आमच्या श्रद्धानंदपेठ वार्डात गंगाधररावांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे त्यांचा घरोघरी जाऊन जनसंपर्क सुरू होता. 

तत्कालीन जनसंघाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ इंदुरकर हे माझ्या वडिलांचे स्नेही होते. एक दिवस रात्री ८.३० च्या समोर सुमारास बाहेरूनच राजाभाऊंचा खणखणीत आवाज ऐकू आला "आहेत का रामभाऊ?" आणि नेहमीच्या पद्धतीने समोरचा उघडा दरवाजा बघून ते आत येऊन बसले. त्यांचा आवाज ऐकून माझे वडील बाहेर आले. मी देखील कोण आलय ते बघायला बाहेर आलो. राजाभाऊंसोबत आणखी एक व्यक्ती होती. राजाभाऊंनी त्यांची आणि बाबांची ओळख करून दिली. "रामभाऊ हे गंगाधर फडणवीस, तुमच्या वॉर्डातून जनसंघाचा उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत. त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुमची." मग गंगाधरवांकडे बघत राजाभाऊ म्हणाले "गंगाधर हे रामभाऊ पाठक, इथल्या सायंटिफिक सोसायटीचे आणि बाजूच्या अत्रे लेआउट सोसायटीचे पदाधिकारी आहेत. यांचा येथे होल्ड चांगला आहे. तेव्हा यांच्या संपर्कात तुम्ही राहा." मग थोडा वेळ इतर गप्पा झाल्या. 

त्या दिवशी रात्री पोळ्या कमी पडतील म्हणून आईने आम्हा मुलांसाठी थालीपीठं केली होती. बाबांनी सहज राजाभाऊंना विचारले "राजाभाऊ गरम थालीपीठ खाणार का?" गंगाधररावांकडे बघत राजाभाऊ म्हणाले "आता रात्री उशिरापर्यंत फिरायचे आहे. तर थोडं थोडं खाऊन घेऊया" गंगाधररावांनी देखील होकार दिला. मग दोघांसाठी देखील गरम थालीपीठ घेऊन येण्याचे मला सांगण्यात आले. मी थालीपीठाच्या प्लेट घेऊन बाहेर गेलो, तर राजाभाऊंनी सांगितले. "हा अविनाश. इथला संघाचा स्वयंसेवक आहे, आपल्याला प्रचारासाठी उपयोगाचा राहील." गंगाधरराव माझ्याकडे बघून हसले. ती माझी त्यांची पहिली भेट होती. मग राजाभाऊंनी माझ्या आईला आवाज दिला "वहिनी आज याला थालीपीठ खाऊ घातलं आहे. आता निवडून आल्यावर काम केलं नाही तर याला झाडूच दाखवा." त्यावर सर्वच खळाळून हसले. गंगाधरराव लगेच म्हणाले "वहिनी हाती झाडू घ्यायची वेळ येऊ देणार नाही." तेव्हापासून गंगाधरराव कधीही घरी आले की "वहिनी थालीपीठ आहेत का?" म्हणून आवाज द्यायचे. 

यथावकाश महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आणि गंगाधरराव आमच्या वार्डातून नगरसेवक म्हणून विजयी झाले. मग त्यांच्या आमच्याकडे भेटीगाठी होऊ लागल्या. फक्त आमच्या घरीच नाही तर वस्तीत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, तर कधी येता जाता लक्ष्मी नगरच्या संघाच्या सायं शाखेत त्यांची भेट होऊ लागली. हळूहळू स्नेहबंध घट्ट होऊ लागले होते. 

गंगाधरराव पानाचे खूपच शौकीन होते. त्यामुळे ज्या ज्या वस्तीत जायचंय त्या वस्तीत त्यांचा एक पानवाला ठरलेला असायचा. आमच्या लक्ष्मी नगर मध्ये सुद्धा पाण्याच्या टाकी जवळचा बाबुराव पानवाला हा गंगाधर रावांचा ठरलेला पानवाला होता. गंगाधरराव अगदी वऱ्हाडी खाक्यातले, त्यामुळे पोट्ट्या, बापाजी, वगैरे असे शब्द ते अत्यंत प्रेमाने वापरायचे. आमच्या घरी आले की बाबांची त्यांचे बोलणे चालू व्हायचे. मी समोर दिसलो की मग ते आवाज द्यायचे "बे पोट्ट्या बाबुरावकडे जा आणि त्याला गंगाधररावचं पान मागितलं म्हणून सांग" मग मी सायकल घेऊन पळत जात असे आणि गंगाधररावांसाठी पान घेऊन येत असे. त्यांची ही आवड माहीत असल्यामुळे बरेचदा आधीच बाबा मला गंगाधररावांसाठी पान घेऊन ये म्हणून पिटाळायचे.

१९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तानचे युद्ध सुरू झाले. त्यावेळी नागपुरात प्रथमच ब्लॅकआउटचा ऑर्डर देण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी गंगाधरराव लक्ष्मी नगरला आले. रात्री त्यांनी भटवडेकरांच्या घरी वस्तीतल्या तरुणांची विशेषतः लक्ष्मी नगर संघ शाखेतल्या तरुणांची बैठक घेतली. तिथे रोज रात्री प्रत्येक लाईन मध्ये फिरून लोकांनी लाईट बरोबर बंद केले आहेत की नाही, खिडक्यांना पडदे लावले आहेत किंवा नाही, हे बघण्याची जबाबदारी आम्हा तरुणांवर त्यांनी सोपवली. फक्त जबाबदारी सोपवून ते थांबले नाहीत, तर रोज रात्री ते साधारणपणे आठच्या सुमारास चक्कर मारायचे. मग प्रत्येक गल्लीत कोण कोण फिरते आहे, तिथे स्कूटरने जाऊन त्या तरुणांना गंगाधरराव भेटून येत असत. मग रात्री उशिरा भाटवडेकरांच्या घरी सर्वांना चहा देखील पाजायचे. त्यावेळी प्रत्येक तरुणाला ते नावानिशी ओळखू लागले होते. युद्ध संपल्यावर ते प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांनाही भेटून आले. तुमच्या मुलाच्या सहकार्यामुळे आम्ही लक्ष्मी नगरात ब्लॅक आउट सांभाळू शकलो हे आवर्जून त्यांनी प्रत्येकाकडे सांगितले देखील होते. प्रत्यक्ष नगरसेवक घरी येतो बघून सगळ्यांचेच आई-वडील देखील सुखावले होते. 

त्या काळात उन्हाळ्यात लक्ष्मीभवन चौकात गंगाधरराव रसवंती चालवत असत. मग आम्ही धरमपेठेत काही कामाने गेलो की हमखास गंगाधर रावांकडे रस प्यायला जात असू. जर गंगाधरराव रसवंतीत असले तर आम्ही मुलं दिसलो की ते स्वतःहून भेळ दहिवडा असे काहीतरी आवर्जून खायला लावायचे. मग ते काउंटर सोडून आमच्या सोबत येऊन बसत आणि थोडा वेळ गप्पा देखील मारत. तिथे बसल्या बसल्या लक्ष्मी नगरात काय चालले आहे याची माहिती देखील ते हळुवारपणे काढून घेत असत. 

१९७२ साली खापरीला झालेल्या संघाच्या शिबिरात कबड्डी खेळताना गंगाधररावांचा पाय फ्रॅक्चर झाला. मग बरेच दिवस त्यांचा पाय प्लास्टर मध्ये होता. धरमपेठ परिसरालगत असलेल्या गवळी पुरातल्या गवळ्यांचे गंगाधरराव नेते होते. या गवळ्यांना दूध विकताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा त्रास होतो अशी त्यांची तक्रार होती. मग त्या गवळ्यांनी कार्पोरेशनवर मोर्चा काढायचे ठरवले. त्या मोर्चात आम्ही तरुण मुलांनी देखील सहभागी व्हावे असे गंगाधररावंनी कळवल्यामुळे आम्ही देखील मोर्चात गेलो होतो. गंगाधर रावांचा पाय फ्रॅक्चर झाला असताना ते मोर्चात कसे जाणार हा प्रश्न होता. मात्र तिथे दोन गवळ्यांच्या मदतीने गंगाधरराव एका रिक्षात चढले आणि रिक्षात उभे राहून त्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. तशाच अवस्थेत त्यांनी कार्पोरेशन समोर गवळ्यांच्या समस्यांबाबत भाषणही दिले होते. 

१९७५ मध्ये पुन्हा कार्पोरेशनच्या निवडणुका आल्या. त्यावेळी गंगाधर रावांच्या विरोधात काँग्रेस मधून कोण उभा केला जाणार यावर वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. सुमारे दोन महिने आधी एका रविवारी गंगाधरराव घरी बाबांना भेटायला आले. त्यांना आलेले पाहून मी गंगाधर रांची फिरकी घेतली "आल्या निवडणुका आल्या, आता सर्व नेते घरी येणारच" असे मी म्हणतात गंगाधरराव डोळे काढून माझ्यावर हात उगारात म्हणाले "चुप बे पोट्ट्या, तुला गंमत सुचते का?" आणि मग स्वतःच हसू लागले.. वडिलांना म्हणाले "पाठक साहेब हे पोरगं जरा जास्तच हुशार झालंय. याला जरा इंजेक्शन द्यावे लागते." आणि मग त्यावर सगळेच खदखदून हसलो.

१९७५ च्या निवडणुकीत आमच्यापेक्षा वयाने थोडा ज्येष्ठ असलेला पण आमचाच एक मित्र एड. शरद देशमुख याने जनसंघात उमेदवारी मागितली होती. मात्र त्याला आमच्या वॉर्डातून उमेदवारी नाकारण्यात आली. मग त्याने अपक्ष म्हणून अर्ज करायचे ठरवले. आम्ही सर्व तरुण मंडळी शरदच्या बाजूने उभे राहायचे ठरवले. अर्थात आमची ती पोट्टेशाहीच होती. शरदने अर्ज दाखल केला आणि आम्ही देखील त्याच्या प्रचारात लागलो. गंगाधररावांना हे कळतच ते फारच अस्वस्थ झाले. आम्हा सर्व मुलांना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जनसंघाच्या ज्येष्ठ नेत्या सुमतीताई सुकळीकर यांनी देखील शरदच्या घरी जाऊन त्याची समजून घातली. मात्र आम्ही कोणीच ऐकायला तयार नव्हतो. शेवटी हे पोट्टे बहेकले आहेत. बहकू द्या त्यांना म्हणून गंगाधर रावांनी आमचा नाद सोडला. आम्ही सर्वच तरुण मित्रांनी शरद देशमुख चा प्रचार केला. मतदान झाले आणि मतमोजणी देखील झाली. त्या मतमोजणीत गंगाधर रावांना २४०० मते मिळाली तर शरदला फक्त तीनशे मते. शरद चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. तर गंगाधरराव दणदणीत मताधिक्याने 
 विजयी झाले होते. गंगाधरराव विजयी झाले कळल्यावर आम्ही सर्वच तरुण मंडळी त्यांच्या विजय मोर्चा जल्लोष करायला देखील गेलो, आणि नाचत नाचतच त्यांना लक्ष्मीनगरत घेऊन आलो. लक्ष्मी नगर मध्ये आधी भाटवडेकरांच्या घरी त्यांचे कार्यालय होते तिथे ते थोडा वेळ थांबले, आणि मग वस्तीतून फेरफटका मारायला ते निघाले. मला बघितल्यावर त्यांनी चौकशी केली "कोठे आहे तुझे बापाजी?" त्यावेळी बाबांना ब्ल्यू झाला होता .टेंपरेचर होते. त्यामुळे ते घरीच झोपून होते. मग मी गंगाधर रावांना सांगताच ते म्हणाले "चल मी तुझ्या घरी तुझ्या बाबांना भेटायला येतो" भाटवडेकरांच्या घरून त्यांची मिरवणूक निघाली. आमच्या घराजवळच्या चौकात त्यांनी रिक्षा थांबवली. आणि ते रिक्षातून खाली उतरले, आणि मला म्हणाले "चल तुझ्या घरी" आणि पायीच चालत ते घराकडे आले. ते घरी येऊ शकतात ही शक्यता लक्षात घेऊन मी एका मित्राला आधीच हार आणून ठेवायला पिटाळले होते. त्यामुळे तो हार घेऊन आलाच होता. घरी आल्यावर ते घरात येऊन बाबांना भेटले. बाबांनी हार घालून त्यांचे अभिनंदन केले. मग दोन मिनिट बसले आणि बाबांच्या तब्येतीची चौकशी केली.तेव्हा माझी आई म्हणाली "अविनाश तुमच्या विरोधात प्रचार करत होता. आता तुमच्या बरोबरच आला का?" तर गंगाधरराव ताबडतोब म्हणाले "जाऊ द्या ना वहिनी, पोट्टे बहक्ले होते. आता आणतोय एकेकाला लाईनीवर" म्हणून त्यांनी माझ्या पाठीत धपाटा घालत मला घेऊन पुन्हा मिरवणुकीकडे निघाले. 

त्यावेळी सर्व विरोधकांनी एकत्र येत महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचे असे ठरवले होते. या तडजोडीत गंगाधरराव नागपूरचे उपमहापौर म्हणून विजयी झाले. आपला नगरसेवक उपमहापौर झाला म्हणून आमचे लक्ष्मी नगर वासी चांगलेच आनंदले होते. उपमहापौर म्हणून गंगाधररावांनी आपल्या धडाकेबाज पद्धतीने काम करायला देखील सुरुवात केली होती. त्यावेळी नागपूर युवक केंद्र नामक सामाजिक संघटनेत मी सक्रिय होतो. त्या संघटनेतर्फे आम्ही उन्हाळ्यात पाणपोई सुरू करायचे ठरवले होते. मग मी गंगाधररावांकडे गेलो. त्यांनी आम्हाला शंकर नगरला एक जागा शोधून देत तिथे तीन महिने विनामूल्य पाणी मिळेल अशी देखील व्यवस्था करून दिली. त्यामुळे आमच्या संघटनेत माझा भाव चांगलाच वाढला होता.

त्याच वर्षी १९७५ मध्ये जून मध्ये आणीबाणी लागू झाली. दुसऱ्याच दिवशी गंगाधररावांना अटक करून तुरुंगात ठेवलेले गेले. १८ महिने ते तुरुंगातच होते. याच दरम्यान शिक्षण आटोपून मी धरमपेठेत गंगाधररावांच्याच घराजवळ फोटो स्टुडिओ सुरू केला होता. साधारणतः वर्षभरात म्हणजेच ऑगस्ट १९७६ मध्ये एक दिवस स्टुडिओ समोरून स्कूटरवर गंगाधरराव जाताना दिसले. मी लगेच स्टुडिओत माणसाला लक्ष ठेवायला सांगून  सायकल घेऊन गंगाधररावांच्या मागे पाठलाग करत निघालो. कोपऱ्यावरच्या पान ठेल्यावरच ते भेटले. मग दहा मिनिटे आमच्या गप्पा झाल्या. तीन दिवसांच्या पॅरोलवर मी आलो आहे, उद्या परत जाईन असे त्यांनी सांगितले. 

जानेवारी १९७७ मध्ये आणीबाणी शिथील झाली. परिणामी गंगाधर रावांची सुटका झाली. मग त्यांनी स्वतःला जनता पक्षाच्या प्रचारात झोकून दिले होते. देशात जनता पक्षाचे सरकार आले. गंगाधरराव पुन्हा राजकारणात पूर्वीसारखेच सक्रिय झाले होते. 

वर्षभराने महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी पश्चिम नागपूरतून ताई सुकळीकर उमेदवार होत्या. त्यांच्या प्रचारासाठी गंगाधर रावांनी जीवाचे रान केले. मात्र त्यावेळी विदर्भात जनता पक्षाला चांगलाच फटका बसला होता. ताई पराभूत झाल्या होत्या. रात्री मतमोजणी झाली तेव्हा पेंडॉलमध्ये काहीसे हताश झालेले गंगाधरराव मला भेटले. आजही त्यांचा तो पडलेला चेहरा मला आठवतो. 

१९७८ मध्ये लगेचच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आल्या. त्यात नागपूर विभागातून गंगाधररावांना जनता पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली होती. निवडणूक जाहीर होताच गंगाधरराव प्रचारात सक्रिय झाले. त्या दरम्यान एक दिवस संध्याकाळी माझ्या स्टुडिओत गंगाधरराव येऊन पोहोचले आणि आवाज देत म्हणाले "अबे, माझे तीन-चार चांगले फोटो काढ बरं. आता पेपरात द्यायला लागतील." मग त्यांना बसवून मी तीन-चार वेगवेगळ्या पोजेस मध्ये त्यांचे फोटो काढले. दोन दिवसांनी त्या चारही फोटोच्या प्रति करून त्यांना दिल्या होत्या. त्यातला एक फोटो खूपच सुरेख आला होता. त्याचा मोठा  एनलार्जमेंट करून मी स्टुडिओच्या शोकेसमध्ये लावला होता. नंतर पुढली काही वर्षे लहान असलेले देवेंद्र आणि आशिष दोघेही हा माझ्या बाबांचा फोटो इथे लागला आहे असे आपल्या मित्रांना येऊन दाखवायचे सुद्धा. त्याच फोटोचा कलर एनलार्जमेंट सध्या देवेंद्रच्या नागपुरातील कार्यालयात त्याच्याच खुर्चीमागे लावलेला आहे. 

त्या निवडणुकीत गंगाधरराव दणदणीत मताधिक्याने निवडून आले. आता ते आमदार झाले होते. त्यामुळे त्यांचा व्याप वाढला होता. परिणामी भेटी खूप कमी झाल्या. तरीही मला आठवते १९८० मध्ये दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून मला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याची बातमी वाचून गंगाधरराव स्वतः स्टुडिओत अभिनंदन करायला आले होते. याच दरम्यान त्यांच्या पुतणीच्या आणि पुतण्याच्या लग्नात देखील त्यांनी आवर्जून निमंत्रणही दिले होते. 

नंतर मग त्यांच्या वाढत्या व्यस्ततेमुळे ते फारसे नागपुरात सापडतच नसत. कधीमधी मुंबईत अधिवेशन काळात गेलो तर त्यांची भेट व्हायची. १९८४ च्या निवडणुका नंतर देशात जे काही स्थित्यंतरे आले, त्यात मग सर्वच भेटी कमी झाल्या होत्या. १९८६ मध्ये गंगाधर रावांना कर्करोगाने ग्रासले असल्याची बातमी कानावर आली. त्यावेळी एकदा घरी जाऊन भेटलो होतो. मग हळूहळू त्यांना बोलणे देखील कठीण झाल्याचे कानावर आले. 

आणि ११ नोव्हेंबर १९८८ च्या संध्याकाळी स्टुडिओत बसलो असतानाच गंगाधरराव गेल्याचीच बातमी आली. मी लगेचच त्यांच्या घरी पोहोचलो. बातमी खरी होती. दुसऱ्या दिवशी गंगाधर रावांच्या अंत्ययात्रेला अलोट जनसागर लोटला होता. त्यावरून ते जनसामान्यांमध्ये किती लोकप्रिय होते हे लक्षात येत होते. 

गंगाधरराव सर्वार्थाने मोठेच नेते होते. ते आधीच्या जनसंघात आणि मग भारतीय जनता पक्षात ज्या काळात होते, त्या काळात पक्षाला समाजात फारसे स्थान नव्हते. मात्र एक चतुर राजकारणी आणि संवेदनशील लोकसेवक म्हणून त्यांनी स्वतःचे स्थान समाजात निर्माण केले होते. ते कर्करोगामुळे अकाली गेले. अन्यथा आज ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते म्हणून आघाडीवर राहिले असते. 

माझ्या दूरदर्शन छायाचित्रकार आणि नंतर मुद्रित माध्यमातील पत्रकार या कारकीर्दीत अनेक राजकीय नेत्यांची माझे जवळचे संबंध आले. मात्र माझ्या आयुष्यात आलेला पहिला राजकीय नेता गंगाधरराव होते. त्यांचे आणि माझे वयात अंतर बरेच होते. तरीही जे काही स्नेहबंध निर्माण झाले होते, ते त्यांनी अखेर पर्यंत जपले. माझ्यासाठी हे भाग्यच आहे असे मी समजतो. आज त्यांच्या सदतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्याच इथे तुमच्याशी शेअर करतो आहे.
close