shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजासाठी ‘वधू-वर परिचय मेळावा’ २७ मे रोजी पुण्यात

पुणे (प्रतिनिधी) : वडार समाजातील युवक-युवतींच्या विवाह जुळवणी प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि समाजातील वाढत्या अपेक्षा व अडचणींवर उपाय म्हणून V-20 प्रबोधन मंच, पुणे यांच्या वतीने भव्य वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा बुधवार, दिनांक २७ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन मंगल कार्यालय, धनोरी, पुणे येथे पार पडणार आहे. 


समाजात विवाह जुळवणी प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत असून, मुलगा-मुलींसाठी वाढलेल्या अपेक्षा, शिक्षण, आर्थिक स्थिती आणि सामाजिक निकष यामुळे अनेकांना योग्य जोडीदार मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर समाज प्रबोधनाच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या वेळी ८५ हून अधिक वधू-वरांनी सहभाग नोंदवला होता, तसेच काही विवाह जुळवणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याचेही आयोजकांनी सांगितले. 

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक वधू-वरांनी आपला बायोडाटा, छायाचित्रे तसेच आवश्यक कागदपत्रे २० मे २०२६ पूर्वी आयोजकांकडे पाठविणे आवश्यक आहे. तसेच मेळाव्याच्या दिवशी पालकांसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे. 
हा उपक्रम पूर्णपणे सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येत असून, वधू-वरांमध्ये प्रत्यक्ष संवाद घडवून आणणे हीच मंचाची भूमिका राहणार आहे. विवाह जुळवणीची अंतिम जबाबदारी संबंधित कुटुंबांवरच असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

वडार समाजातील युवक-युवती व त्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
close