एरंडोल – श्री साई गजानन संस्थानतर्फे आयोजित एरंडोल ते शेगाव पायी वारी यंदा ३६व्या वर्षात प्रवेश करत असून, ६ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत भक्तिरसात न्हाऊन निघणारा हा प्रवास पार पडत आहे. वारीची सुरुवात पूर्वसंध्येला पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या भव्य शोभायात्रेने झाली.
वारीचे सर्वांगीण नियोजन संस्थानचे अध्यक्ष व वारी प्रमुख बापू मोरे आणि संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे काटेकोरपणे करण्यात आले आहे. संस्थानतर्फे पुरुष व महिलांच्या दोन स्वतंत्र वाऱ्या आयोजित होतात.
वारीदरम्यान भाविकांसाठी सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचे भोजन, सायंकाळचा चहा व रात्री मुक्कामासह जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था स्थानिक भक्तांनी केली आहे. वाऱ्यात विणाधारी म्हणून बाळू पाटील तर चोपदार म्हणून अर्जुन झेंडे यांची महत्त्वाची भूमिका असून, वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या पायी यात्रेचे मुक्काम भातखेडे, विटनेर, जामनेर, बोदवड, मलकापूर, नांदुरा आणि शेगाव (गोमाजी मंगल कार्यालय) येथे निश्चित आहेत. प्रत्येक ठिकाणी निवास, भोजन तसेच भव्य सत्संगाचे आयोजन भाविकांना वेगळा आध्यात्मिक अनुभव देणारे आहे.
वारीत सहभागी प्रत्येक भाविकाला टी-शर्ट आणि वैद्यकीय किट नाममात्र शुल्कात देण्यात येते. शहरासह जिल्ह्यातील भाविक, तरुणाई आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह यंदाही उल्लेखनीय दिसत आहे.
संस्थानातर्फे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर गुरुवारी होणारा सत्संग हा भाविकांचे विशेष आकर्षण असून, साईबाबा आणि गजानन महाराज यांची एकत्र प्रतिष्ठापना असलेले हे मंदिर महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण स्थळ मानले जाते.
श्रद्धा, सेवा आणि अध्यात्म यांचा संगम असलेली एरंडोल-शेगाव पायी वारी, भाविकांच्या मनातील जिवंत परंपरा म्हणून यंदाही भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे.


