एरंडोल – खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेत जीवन जगण्याची दृष्टी असून त्यातील भावार्थ जगाला तत्त्वज्ञानाची शिकवण देतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक कवी प्रवीण महाजन यांनी केले. बहिणाबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त पुस्तकांच्या बगीच्यात राष्ट्रीय साहित्य संघातर्फे आयोजित काव्यमहोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक लताताई सुतार तर प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंदा ठाकूर व कीर्ती महाजन उपस्थित होते.
काव्यमहोत्सवात कवयित्री मनीषा रघुवंशी यांनी ‘लेकरसनी माय’ या कवितेतून मातेच्या प्रेमाची मायाळू व्याख्या केली. विद्यार्थिनी पूनम ठाकूर यांनी अहिराणी भाषेतील ‘माय’ कवितेतून आईच्या अस्तित्वाची जीवनातील अनिवार्यता अधोरेखित केली. ज्येष्ठ कवयित्री लताताई सुतार यांच्या ‘घर’ कवितेतून घराचे भावविश्व व मायेचा ओलावा तर प्रा. मयूर वाडी यांच्या ‘उघड्यावरचा संसार’ कवितेतून स्त्रीजीवनातील वेदना प्रभावीपणे व्यक्त झाल्या.
कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण आधार महाजन यांनी ‘माझी बहीणाबाई’ या कवितेतून बहिणाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा परामर्श घेत त्यांचे साहित्य वारसा सुंदररीत्या उजळवला. कार्यक्रमाचे आभार रमेश दोडे यांनी मानले.


