shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव भागात सायंकाळनंतर थंडीमुळे शुकशुकाट...


लोक घराबाहेर पडणे टाळत घरातच थांबतात...

वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे) :- मागील आठ दिवसांपासून अहिल्या नगर तालुक्यातील वाळकी,गुंडेगाव परिसरात हवेतील गारठा वाढला असुन शेती व परिसरातील हिरवाईमुळे या थंडीत अजुनच वाढ होत आहे. थंडी वाढल्याने नागरिक शाल,स्वेटर,कानपट्टीचा वापर करत आहेत.त्यातुनही थंडी पळाली नाही तर शेकोटीचा आधार घेतला जात आहे.
        नोव्हेंबर डिसेंबर मध्येच तालुक्यातील गुंडेगाव, वाळकी देऊळगाव, राळेगण थंडीच्या तीव्रतेने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून यंदा मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली असून थंडीमुळे दिवसभराच्या सत्रात शेती कामे उरकून घेण्याकडे बळीराजाचा कल वाढला आहे. नेहमी वर्दळ असलेले रस्ते निर्मनुष्य होत आहेत.गावांमध्ये सायंकाळीच सहा ते सात वाजताच रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे.यातच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रता अधिक वाढणार असल्याने थंडी पासून संरक्षणासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत.

          चार दिवसांपूर्वी कमी झालेली थंडी रविवारी पुन्हा जोरदार परतली असून दिवसभर बदलत्या हवामाना नंतर रात्री व पहाटे थंडीची स्पष्ट जाणीव होत असून तापमानातील घट ग्रामीण भागात जाणवण्याइतकी ठळक दिसत आहे.आर्द्रतेचे प्रवाह कमकुवत झाल्याने हवेत गारवा वाढला असून वातावरणात थंड हवा वाढल्याचं दिसून येत आहे. थंडीच्या तडाख्याने गुंडेगाव, वाळकी, देऊळगाव, राळेगणकरांना चांगलीच हुडहुडी भरलेली दिसत आहे.दिवसभर अधूनमधून ऊन-ढगांचा खेळ सुरू असताना सायंकाळी सूर्यास्तानंतर गुंडेगाव परीसरात थंडीची चाहूल लागत गारव्यामुळे हुडहुडी भरत आहे.
          कोरोना काळात जसे रस्ते निर्मनुष्य झाले होते.त्याच पध्दतीने सायंकाळी रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत आहे.सध्या लग्नसराईचा हंगाम असतानाच वाढलेल्या थंडीमुळे लग्नसोहळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.थंडीमुळे नेहमी गजबजलेल्या चौकात शुकशुकाट आहे. नेहमी वर्दळीच्या मार्गावर लोकांची संख्या तुरळक झाली आहे.थंडीमुळे गावे गारठलेली पहायला मिळत आहेत.पुढील दोन महिने ही थंडी माणसांसह वन्यप्राणी, जनावरांसाठीही अडचणीचा ठरणार आहे.


 थंडी वाढल्यानंतर गावातील नागरिकांनी उबदार कपड्यांचा आश्रय घेतला आहे. स्वेटर, जॅकेट, कानटोपी यांचा वापर वाढला असून शेकोट्या पेटवून उब घ्यावी लागत आहे.सकाळी फिरणारे नागरिक, व्यायाम करणारे तरुण यांना वाढलेली थंडी विशेष जाणवत आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना गारवा त्रासदायक ठरत आहे.

नाना सोनवणे -  गुंडेगाव ग्रामस्थ.
close