*बनसुडे विद्यालयात गीता जयंती उत्साहात* *साजरी; क्रीडा क्षेत्रात* *उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या* *विद्यार्थ्यांचा गौरव*
इंदापूर: पळसदेव, ता. इंदापूर (१ डिसें.)— गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयात गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत बनसुडे यांच्या हस्ते भगवद्गीता ग्रंथपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या इंग्लिश व सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचे महत्त्व, कथा, श्लोक, गवळण गीत अशा विविध कलाप्रकारांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांना भारावून टाकले. तसेच शिक्षक सारिका चितळकर, अर्चना बोंद्रे व मनीषा कुदळे यांनीही गीत, श्लोक व बोधकथा सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
प्राचार्या वंदना बनसुडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून गीतेतील श्लोकांचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थी जीवनात गीतेतील तत्वज्ञानाचे पालन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘खेलो स्टुडन्ट कप’ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बारामती येथे इंग्लिश मीडियम स्टुडन्ट असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धेत शाळेच्या १२ वर्ष वयोगटातील मुला–मुलींच्या खो-खो संघांनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेला घवघवीत यश संपादन करून दिले. तसेच १४ वर्ष वयोगटातील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेला विद्यार्थी प्रणव शिंदे, द्वितीय क्रमांकाचे यश मिळवणारा आर्यन बनसुडे आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणारा प्रसाद बनसुडे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संस्था अध्यक्ष हनुमंत बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापिका सुवर्ण वाघमोडे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे यांनी केले, तर आभार ज्योती मारकड यांनी मानले. सांस्कृतिक विभागातील शिक्षकांनी व सहकारी शिक्षकांनी आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

