श्रीरामपूर / प्रतिनिधी:
वृत्तपत्र क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'दर्पण पुरस्कार' येथील दैनिक स्नेहप्रकाशचे मुख्य संपादक प्रकाश बापूराव कुलथे यांना जाहीर झाला आहे.
६ जानेवारी पत्रकार दिनी सदरचा पुरस्कार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगांव असलेल्या कोकणातील पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे स्मारक म्हणून उभारलेल्या दर्पण सभागृहात समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या पत्रकारांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. राज्यातील अनेक नामवंत संपादक व ज्येष्ठ पत्रकारांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील महाराष्ट्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
श्री. प्रकाश कुलथे हे गेली ३५ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत. स्नेहप्रकाश प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून आत्तापर्यंत शेकडो पुस्तके प्रकाशित करून लेखकांना प्रोत्साहित केले आहे.
श्री.प्रकाश बापुराव कुलथे यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या सामाजिक वृत्तपत्रे क्षेत्रासह अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ते दैनिक स्नेहप्रकाश चे मुख्य संपादक असून साप्ताहिक वर्ल्ड सामना चे संस्थापक संपादक, वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य अधीस्विकृती समिती, महाराष्ट्र शासन सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी चे विश्वस्त, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक चे उपाध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषद,मुंबई चे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा श्रीरामपूर चे कार्याध्यक्ष, श्रीरामपूर पत्रकार संघाचे सचिव, हिंद सेवा मंडळाच्या क. जे. सोमैय्या हायस्कुल, श्रीरामपूर चे सदस्य म्हणून काम पाहत असून नुकतीच त्यांची इंडियन लँग्वेजेस न्यूज पेपर असोसिएशन (इलना) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
यापूर्वी पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून बाळशास्त्री जांभेकर "दर्पण पुरस्कार" हा वृत्तपत्र क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देखील त्यांना आता जाहीर झाला आहे.श्रीरामपूर शहर तसेच जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने हा संपूर्ण श्रीरामपूरकरांचा सन्मान आहे असे मानले जात आहे.श्री कुलथे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील तील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

