shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'मोरारजींची दारूबंदी आणि राज्यपालांचा 'शेरलॉक होम्स' !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

ही गोष्ट आहे १९५५-५६ सालची. मुंबई राज्याची. 

मुंबईचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई आणि राज्यपाल होते ओडिशाचे माजी (आणि भावी) मुख्यमंत्री डॉ हरेकृष्ण महताब !!
मोरारजी देसाई दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मुंबई राज्यात दारूबंदी कायदा अट्टाहासाने लागू केला. 
त्याउलट, पंडित नेहरूंचे विश्वासू असलेले राज्यपाल डॉ हरेकृष्ण महताब दारूबंदीच नाही तर विनोबा भावेंच्या भूदान चळवळीचे देखील वैचारिक विरोधक होते. 

आपले जीवनचरित्र 'व्हाईल सर्व्हिंग माय नेशन: रिकलेक्शन्स ऑफ अ काँग्रेसमन' मध्ये डॉ महताब यांनी त्यांच्या मुंबईच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील दारूबंदीबद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.  त्यांच्याच शब्दात: 

"एके दिवशी सकाळी एक पारशी सद्गृहस्थ भेटण्यास आले. 

गप्पांच्या ओघात ते म्हणाले मुंबईतील दारूबंदी हा एक निव्वळ फार्स (देखावा) आहे. 

मुंबईत सर्व प्रकारचे - विशेषतः विदेशी मद्य, ग्राहकाला हवे तेवढे मिळते. 
अर्थात मूळ किमतीपेक्षा थोडे अधिक पैसे मोजावे लागतात !  

मला हवे ते मद्य मी आपल्या सूत्रांकडून - शासनाच्या दृष्टीने बेकायदेशीर -  मिळवतो, असे त्याने प्रांजळपणे सांगून टाकले  !!  

त्याचे बोलणे ऐकून मला दारूबंदीची प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली. 

त्याकाळात मुंबईच्या दारूबंदीची देशभर चर्चा होती. 

मी त्या गृहस्थांला बेकायदेशीर दारू विक्री होते, तिथे ते मला घेऊन जाल का म्हणून विचारले.  त्यांनी होकार दिला. 

परंतु ही भेट पूर्णपणे गुप्त ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिसांना व दारूबंदी विभागाला कळल्यास खरी परिस्थिती समजणार नाही असे त्यांनी सांगितले.  

त्यांना म्हटलं, उद्या सकाळी तुम्ही कार घेऊन लवकर या आणि मला सकाळी ८ वाजेपर्यंत राजभवनात आणून सोडा. 

या भेटीची माहिती मी आपल्या ए.डी.सी. किंवा कर्मचाऱ्यांपैकी कुणालाही सांगितली नाही.

ते गृहस्थ आले आणि आपल्या कारमधून मला शहरभर फिरवून आणले. 

शहरात अनेक ठिकाणी विदेशी दारू किती सहज उपलब्ध आहे हे दाखवले. 

हा सगळा व्यवहार इतका उघडपणे कसा काय चालतो, हे पाहून खरंच आश्चर्यचकित झालो. 

राजभवनात परतल्यावर, माझे ए.डी.सी. कॅप्टन सुंधे यांना मी प्रत्यक्ष पाहिलेली वस्तुस्थिती सांगितली. 

ते म्हणाले की सर सर्वांना माहिती असलेल्या या गोष्टीसाठी आपण इतका त्रास का घेतला?

इतक्या दूर जाण्याची आवश्यकता नव्हती; जवळच्या पोलीस चौकीजवळच मी आपल्याला 'वस्तुस्थिती' दाखवतो !

मला पुन्हा पाहण्याची उत्सुकता लागली. 

एडीसी मला जवळच्या पोलिस चौकीकडे घेऊन गेले. चालकाला कार थोड्या अंतरावर थांबवण्यास सांगितली. 

ते चौकीत गेले आणि तिथल्या कॉन्स्टेबलला काय हवे आहे ते सांगितले. 

कॉन्स्टेबलने एक बाटली काढली आणि कॅप्टन सुंधे यांना दिली.

आम्ही परत आलो. 

कायद्याची सर्रास होत असलेली थट्टा कशी थांबवता येईल, याचा विचार करू लागलो. 

मुख्यमंत्र्यांचा दुराग्रह आणि मद्यविक्रीत अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे परिस्थिती बदलणे शक्य नाही, याबद्दल माझी खात्री पटली.  

प्रत्यक्षात ही कायद्याची फसवणूक आहे, हे बड्या अधिकाऱ्यांना देखील लक्षात येत नव्हते. 

दारूबंदी समाधानकारक लागू होत आहे याबद्दल मोरारजीभाईं मात्र पूर्णपणे आश्वस्त होते. 

मुख्यमंत्र्यांचा आणि काँग्रेसचा विरोधक असलेल्या एका व्यक्तीसोबत दारूबंदीचे उल्लंघन कसे सर्रास होत आहे हे पाहण्यासाठी आपण स्वतः गुप्त दौरा केला, हे सांगणे देखील मला प्रशस्त वाटत नव्हते. 

पुढे केंव्हातरी सहज बोलताना मी मोरारजीभाईंना दारूबंदी फारशी समाधानकारक नाही आणि दारू कुठेही सहज उपलब्ध आहे, असे सांगितले ! 

त्यांनी माझे म्हणणे ठामपणे खोडून काढले; सरकारच्या विरोधकांनी आपल्याला दिशाभूल करणारी माहिती दिली आहे, असे मला सांगितले. 

कालांतराने मोरारजींनी सरकारच्या दारूबंदी खात्याच्या कर्मचाऱ्यांची एक परिषद भरवली आणि परिषदेच्या अध्यक्षस्थानी मला बोलावले. 

या परिषदेत दारूबंदीमुळे किती लोकांनी दारू सोडली, आतापर्यंत किती अवैध दारू पकडली इत्यादी तपशील देणारी भाषणे झाली. 

परिषदेत सादर केली गेलेली माहिती खरी असावी, अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असे सांगून दारूबंदी नैतिक समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे असे मी सांगितले. 

असो.  

युगानुयुगे भारतीय जनमानसावर नैतिक मूल्यांचा इतका मारा करण्यात आला आहे की वास्तव स्वीकारण्यास आपले लोक सहसा तयार होत नाहीत !!" (उद्धरण समाप्त)
  
मोरारजी देसाई यांनी लागू केलेला दारूबंदी कायदा प्रत्यक्षात कसा राबवला जातो हे पाहण्यासाठी राज्यपाल महताब हे स्वतः 'शेरलॉक होम्स' च्या भूमिकेत गेले होते, हे विशेष  !!
close