शिर्डी नगरपरिषदेचा निकाल: 'चेहऱ्यांपेक्षा कामाला महत्त्व'; विखे पाटलांच्या नेतृत्वावर शिर्डीकरांचा विश्वास!
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
शिर्डी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाने शहराच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीने (भाजप) नगराध्यक्ष पदासह बहुसंख्य जागांवर ऐतिहासिक विजय मिळवत नगरपरिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हा विजय डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वावर जनतेने दिलेली मोहोर असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
नगराध्यक्ष पदावर भाजपचा झेंडा,
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सौ. जयश्री विष्णू थोरात यांनी १२,६१० मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला. त्यांनी आपल्या निकटतम प्रतिस्पर्धी आरणे कल्याणी विठ्ठल (७,६७० मते) यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या पदासाठी एकूण २५,२६३ वैध मते नोंदवली गेली होती.
प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी:
निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी जाहीर केल्यानुसार, विविध प्रभागांतून खालील उमेदवार वैधरित्या निवडून आले आहेत:
• प्रभाग १: श्रीमती त्रिभुवन सुनिता मंगेश (भाजप - जागा १ अ) आणि कोते निलेश मुकुंदराव (राष्ट्रवादी काँग्रेस - जागा १ ब) विजयी.
• प्रभाग २: गोंदकर सतीश गोविंदराव (अपक्ष - जागा २ अ) आणि गोंदकर सुनिता वसंत (शिवसेना - जागा २ ब) यांनी बाजी मारली.
• प्रभाग ३: शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून ठाकरे बापू पांडुरंग (जागा ३ अ) आणि कोते आशाबाई कमलाकर (जागा ३ ब) विजयी झाले आहेत.
• प्रभाग ४: या प्रभागात भाजपचे पूर्ण वर्चस्व राहिले. बर्डे गायत्री राजेंद्र (जागा ४ अ) आणि कोते नितीन उत्तमराव (जागा ४ ब) विजयी झाले.
• प्रभाग ५: भाजपच्या विद्या श्याम जाधव (शेजवळ) (जागा ५ अ) आणि शेळके पाटील अभय दत्तात्रय (जागा ५ ब) यांनी विजय मिळवला.
• प्रभाग ६: भाजपचे गायकवाड सचिन सिताराम (जागा ६ अ) आणि बोऱ्हाडे कोमल किरण (जागा ६ ब) विजयी झाले.
• प्रभाग ७: अपक्ष उमेदवारांनी मुसंडी मारली. सोनवणे सरिता गणेश (जागा ७ अ) आणि शेळके अमित कैलास (जागा ७ ब) हे अपक्ष उमेदवार विजयी ठरले.
• प्रभाग ८: भाजपचे रविंद्र पांडुरंग गोंदकर विजयी झाले. आणि सौ. छाया पोपट शिंदे (अपक्ष) बिनविरोध निवड झाली.
• प्रभाग ९: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या प्रभागात आपली ताकद दाखवली. गोतीस अलका वाल्मिक (जागा ९ अ) आणि गोंदकर दिपक रमेश (जागा ९ ब) विजयी झाले.
• प्रभाग १०: भाजपचे वर्चस्व कायम राहिले. कोते वैशाली दत्तात्रय (जागा १० अ) आणि कोते नितीन पाराजी (जागा १० ब) विजयी झाले.
• प्रभाग ११: या प्रभागातील तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार शिंदे छाया सुधीर (जागा ११ अ), कोते अरविंद सुखदेव (जागा ११ ब) आणि कोते प्रतिक्षा किरण (जागा ११ क) विजयी झाले.
दिग्गजांना धक्का, कामावर शिक्कामोर्तब,
या निवडणुकीत भाजपला मिळालेले निर्भेळ यश हे डॉ. सुजय विखे यांच्या सूक्ष्म नियोजनाचा परिणाम मानला जात आहे. अनेक अनुभवी नेत्यांना पराभवाचा धक्का बसला असून, शिर्डीच्या जनतेने "चेहऱ्यांपेक्षा कामाला महत्त्व" देण्याचा स्पष्ट संदेश या निकालातून दिला आहे. या निकालामुळे जुनी राजकीय समीकरणे कोलमडली असून भाजप कार्यकर्त्यांनी शहरात गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे राजकीय, सामाजिक आणि व्यापारी वर्गातून अभिनंदन होत आहे.

