एरंडोल :- नगरपरिषद निवडणुकीत शहरवासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ७५.१९ टक्के मतदानाचा टप्पा गाठला. नगराध्यक्षपदासह ११ प्रभागांमधील २२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ३१ हजार ३८५ मतदारांपैकी २३ हजार ४९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहाटे मतदान केंद्रांवर संथ गतीने सुरुवात झाल्यानंतर दुपारी व विशेषतः सायंकाळी मतदारांनी मोठी गर्दी केली. युवक व महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मतदान प्रक्रिया रंगतदार बनवली.
वयोवृद्ध मतदारांना उमेदवारांच्या प्रतिनिधींनी व्हीलचेअरच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत आणत सहकार्य केले. किरकोळ वादविवाद वगळता संपूर्ण शहरात मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले. शहरातील ३८ मतदान केंद्रांवर दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. दादासाहेब दि.शं. पाटील महाविद्यालयातील प्रभाग क्रमांक दोन व सात येथे मतदान सायंकाळी सातपर्यंत सुरू होते. उमेदवार आणि त्यांचे समर्थक दिवसभर मतदारांच्या भेटी घेत मतदानाचे आवाहन करीत होते.
प्रभाग क्रमांक तीनमधील महात्मा फुले हायस्कूल मतदान केंद्रावर “आधी मतदान, नंतर लग्न” या धर्तीवर नवरदेव योगेश भागवत मांडेवाळ यांनी विवाह सोहळ्यापूर्वी मतदान करून विशेष लक्ष वेधले. काही केंद्रांवर मतदारांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत असली तरी पिण्याचे पाणी व मंडपाअभावी अडचणींवर मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासक अमोल बागुल यांनी सर्व मतदान केंद्रांना भेट देत पाहणी केली. पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तसेच आरोग्य विभाग, नगर पालिका कर्मचारी व बी.एल.ओ. यांच्या समन्वयातून निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.


