चाकण : जागतिक एड्स दिनानिमित्त नाणेकरवाडी येथील संतभारती ग्रंथालय व चाकण ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स नियंत्रण पथकामार्फत कुरुळी येथील आनंद फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी एच आय व्ही एड्स विषयी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. तसेच पुण्यातील जय मल्हार कला मंचच्या वतीने येथील तळेगाव चौकातील कामगार मजूर नाका येथे हालगी आणि संबळाच्या तालावर गीत सादर करून जनजागृती करण्यात आली.
'काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची', 'कंडोमचा वापर करा, आरोग्याची काळजी घ्या', 'वापरा निरोध, एड्सला विरोध' अशी जनजागृतीपर विविध घॊषवाक्ये लिहिलेले फलक हातात घेऊन चाकण शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कांबळे, संतभारती ग्रंथालयाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर, ग्रंथपाल सुवर्णा कोलते. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजल भोसले, डॉ. महेश आवळे, औषध निर्माणाधिकारी प्रवीण फडतरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अर्चना साळवे व कु. नयन गावडे, एचआयव्ही समुपदेशक संतोष नायकोडी व विलास भवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
समुपदेशक संतोष नायकोडी यांनी सूत्रसंचालन केले, तर ग्रंथपाल सुवर्णा कोलते यांनी आभार मानले.
0000

