धरणगाव 60, कासोदा 61; एकूण 202 दात्यांनी केले रक्तदान...
अमळनेर -- तालुक्यातील कोळपिंप्री येथील श्री चैतन्य नवनाथ आश्रमाचे अध्यक्ष डॉ. दिनेश जिजाबराव काटे म्हणजेच बालकनाथ महाराज यांच्या 37 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 202 नाथभक्तांनी रक्तदान करून आपल्या गुरूंना सदिच्छा व्यक्त दिल्यात.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोळपिंप्री येथील नवनाथ आश्रम म्हणजे नाथ भक्तांच्या चैतन्याचे केंद्र बनले आहे. अनेक भक्त मोठ्या श्रद्धेने व आस्थेने नवनाथ महाराजांच्या चरणी भक्तीभावाने आत्मलीन होतात. या आश्रमाचे उच्चविद्याविभूषित अध्यक्ष ऍड. दिनेश जिजाबराव काटे म्हणजेच सर्व नाथ भक्तांचे गुरु बालकनाथ महाराज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कोळपिंप्री येथील नाथ आश्रमात एका वेगळ्याच ऊर्जेने सर्व नाथ भक्त नवनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. नवनाथ महाराजांच्या चरित्राच्या 40 अध्यायांचे अविरतपणे वाचन - पठण - चिंतन व मनन करण्यात आले. बालकनाथ महाराजांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नाथ भक्तांनी अतिशय उत्साहात रक्तदान करत गुरूंना वंदन केले. वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही भडक कार्यक्रम न घेता सामाजिक जाणीवेतून रक्तदान शिबीर घेणं म्हणजे समाजाप्रति असलेले ऋण फेडण्याचा कार्यक्रम असतो. अडचणीत असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताचा एक एक थेंब अत्यंत महत्वाचा असतो या भावनेतून नाथ भक्तांचं योगदान मोलाचे ठरते. यामध्ये धरणगाव 60, कासोदा 61; एकूण 202 दात्यांनी रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला. हिरे मेडिकल कॉलेज धुळे यांच्या रक्तपेढीने या कार्यासाठी अनमोल सहकार्य केले. रक्तदान कार्यक्रमानंतर दानाच्या झोळीची संवाद्य मिरवणूकीची आश्रमाला प्रदक्षिणा पूर्ण झाली त्यानंतर सर्व नाथ भक्तांच्या उपस्थितीत आरती सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सर्व नाथ भक्तांनी, आलेल्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन गुरुमाऊली बालकनाथ महाराजांचा विविध भेटवस्तू, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, हार देऊन सत्कार केला. त्यानंतर हभप लक्ष्मण महाराज एरंडोलकर यांच्या सुश्राव्य वाणीतून नाथमहिमा कीर्तनाच्या माध्यमातून वर्णन करण्यात आला. गुरु - शिष्य परंपरा दाखवणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला प्रामुख्याने धरणगाव - अमळनेर येथून मोठ्या संख्येने नाथ भक्तांनी उपस्थिती दिली. तसेच जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या अनेक नाथ भक्तांनी देखील गुरुवर्य बालकनाथ महाराजांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रम प्रसंगी धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करून बालकनाथ महाराजांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात. पारंपारिक वाद्यांच्या तालासुरात नाथ भक्तांच्या भक्तीमय वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री चैतन्य नवनाथ आश्रम कोळपिंप्री येथील विश्वस्त, ग्रामस्थ, अमळनेर - धरणगाव - कासोदा यांसह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या नाथ भक्तांनी परिश्रम घेतले.


