जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात कार्यरत सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी एरंडोल येथील ज्येष्ठ ॲड. मोहन बन्सीलाल शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त हे संमेलन २० व २१ डिसेंबर रोजी जळगाव येथे लोकवर्गणीतून होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली.
४३ वर्षांच्या प्रदीर्घ वकिली कारकिर्दीसह साहित्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे ॲड. शुक्ला यांची निवड करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. औदुंबर साहित्य रसिक मंच एरंडोलचे अध्यक्ष, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन, तसेच विविध कवी संमेलन व परिसंवादांच्या माध्यमातून त्यांनी साहित्य चळवळीला बळ दिले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.


