साई संस्थान एम्पलॉइज स्वच्छता कर्मचारी सौ. सुमन आडांगळे यांची कर्तव्यनिष्ठा; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सत्कार
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
श्री साईबाबांच्या मंदिरात आज माणुसकी आणि प्रामाणिकतेचा एक अत्यंत अनुकरणीय प्रसंग समोर आला आहे. साईबाबा संस्थानच्या महिला स्वच्छता कर्मचारी सौ. सुमन प्रकाश आडांगळे यांनी मंदिरात सापडलेली १ लाख २६ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन मूळ मालकाला परत करून कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
आज मंदिरात श्री साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सुमन प्रकाश आडांगळे यांना एक सोन्याची चैन आढळून आली. चैन मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता याबाबत आपल्या वरिष्ठांना माहिती दिली आणि ती चैन तातडीने संरक्षण कार्यालयात जमा केली.
सुरक्षा विभागाने या सोन्याच्या चेनची खातरजमा केली असता, तिचे वजन आणि सध्याचा बाजारभाव पाहता तिची किंमत अंदाजे १ लाख २६ हजार रुपये असल्याचे समोर आले. त्यानंतर योग्य ती पडताळणी करून संबंधित भाविकाला ती चैन सुपूर्द करण्यात आली. आपली गहाळ झालेली सोन्याची चैन परत मिळाल्याने संबंधित भाविकाने सौ. सुमन आडांगळे यांचे मनापासून आभार मानले.
वरिष्ठांकडून गौरव:
सौ. सुमन प्रकाश आडांगळे यांनी दाखविलेली तत्परता आणि प्रामाणिकपणा पाहून संस्थानच्या प्रशासनाने त्यांची तातडीने दखल घेतली. या कामगिरीबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर साहेब तसेच पोलीस निरीक्षक रोहिदास माळी साहेब यांनी सौ. सुमन आडांगळे यांचा विशेष सत्कार केला. यावेळी
सुरक्षा कर्मचारी अरुण गायके व अधिकारी देखील उपस्थित होते.
साईबाबा संस्थानची सुरक्षा टीम भाविकांच्या वस्तूंच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचे आणि कर्मचारी किती प्रामाणिकपणे सेवा बजावतात, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
याप्रसंगी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, साईश्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय महाजन, ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तुषार महाजन, डॉ. किरण गोरे, आकाश आडंगळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिर्डीत येणाऱ्या भक्तांना केवळ देवाचे दर्शनच नाही, तर येथील कर्मचाऱ्यांच्या रूपाने माणुसकीचे दर्शनही घडत असल्याची चर्चा आता साईनगरीत होत आहे.

