साई संस्थान कामगारांची कामधेनू असलेल्या संस्थेच्या संस्थापकाच तैलचित्र लावण्याचे भाग्य मिळाले याचा मनस्वी आनंद - विठ्ठल पवार
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साई संस्थान कर्मचाऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'श्री साई संस्थान को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या कार्यालयात एक ऐतिहासिक आणि भावुक सोहळा पार पडला. संस्थेची मुहूर्तमेढ रोवणारे संस्थापक चेअरमन कै. बळीराम बयाजी कोते पाटील यांचे तैलचित्र तब्बल ६० वर्षांनंतर सोसायटीच्या कार्यालयात सन्मानाने विराजमान झाले. या प्रसंगी कोते कुटुंबीय आणि उपस्थितांनी विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार व संचालक मंडळाचे विशेष आभार मानले.
६० वर्षांची उपेक्षा संपली
श्री साई संस्थान को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना १९५७ मध्ये झाली होती. या घटनेला ६० हून अधिक वर्षे लोटली आणि या काळात २९ मान्यवरांनी चेअरमनपद भूषवले. मात्र, दुर्दैवाने संस्थेचे संस्थापक चेअरमन बळीराम कोते पाटील यांचे छायाचित्र कार्यालयात लावले गेले नव्हते. विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार यांनी पदभार स्वीकारताच जुन्या नोंदी पाहिल्या आणि संस्थापकाचे छायाचित्र शोधून ते सन्मानाने लावण्याचा निर्णय घेतला.
"आमच्या कुटुंबाने विसर पाडला, पण मित्राने आठवण ठेवली" - कमलाकर कोते
यावेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आजवर आमच्या कोते कुटुंबातील तब्बल आठ सदस्य या संस्थेचे चेअरमन झाले, मात्र कोणालाही बळीराम पाटलांची आठवण झाली नाही. ज्यांनी झाड लावले, त्यांनाच आपण विसरलो होतो. मात्र, माझे मित्र आणि विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार यांनी ही चूक सुधारत बळीराम पाटलांचा सन्मान केला, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे." तसेच, भविष्यात संस्थेने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी घरांची सोय करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
"कार्यालयासाठी जागा हवी असल्यास ग्रामस्थ मदत करतील" - सुभाष तात्या कोते
माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते सुभाष तात्या कोते यांनी विद्यमान संचालक मंडळाचे कौतुक केले. ते म्हणाले, "६० वर्षांनंतर संस्थापकांची आठवण झाली, ही खरी कौतुकाची बाब आहे. आता संस्थेचे कार्य वाढले असून, स्वतंत्र आणि भव्य कार्यालयाची गरज आहे. जर जागेची अडचण असेल, तर शिर्डीतील ग्रामस्थ तुम्हाला हवी ती मदत करतील, पण संस्थेचा वटवृक्ष असाच बहरत ठेवा."
"संस्थापकांचे ऋण फेडण्याचे भाग्य मिळाले" - चेअरमन विठ्ठल पवार
सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "साईबाबा संस्थांमधील हजारो कामगारांच्या संसाराला हातभार लावणारी ही संस्था आज कामधेनू ठरली आहे. बळीराम कोते पाटलांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांचा वारसा चालवताना आणि त्यांचे तैलचित्र लावताना मला मनस्वी आनंद होत आहे."
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यासाठी बळीराम कोते पाटील यांचे सुपुत्र अर्जुन कोते, बंधू गोपीनाथ कोते, पुतणे संजय कोते, नातू पंकज कोते तसेच ज्येष्ठ नेते सुभाष तात्या कोते, गंगाभाऊ कोते, अशोकराव कोते मोहनराव कोणे व्हाईस चेअरमन पोपटराव कोते आणि सर्व संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम केवळ तैलचित्र अनावरण नसून, कृतज्ञतेचा आणि जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा ठरला.

