नगर प्रतिनिधी:
शिवसेना पक्षाची प्रतिमा मलिन करणारी व पक्षशिस्तीचे गंभीर उल्लंघन करणारी चुकीची फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते व आमदार अमोल खताळ यांच्या थेट आदेशानुसार संगमनेर शहर अध्यक्ष दिनेश भिमाशंकर फटांगरे यांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या सदर फेसबुक पोस्टमुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद गेला असून, यामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी कोणतीही तडजोड न करता थेट कठोर कारवाईचा निर्णय घेतला.
शिवसेना पक्षामध्ये शिस्त, संयम, जबाबदारी आणि अधिकृत भूमिका यांना सर्वोच्च प्राधान्य असून, कोणताही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता वैयक्तिक मत, अफवा अथवा दिशाभूल करणाऱ्या पोस्टद्वारे पक्षाची भूमिका मांडू शकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यापुढे कोणत्याही पदाधिकारी, कार्यकर्त्याने किंवा सदस्याने पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत, चुकीची, आक्षेपार्ह अथवा पक्षविरोधी सोशल मीडिया पोस्ट केल्यास त्यांच्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.
पक्षाची शिस्त अबाधित राखणे, जनतेसमोर स्वच्छ आणि एकसंध भूमिका मांडणे हेच शिवसेनेचे धोरण असून, याबाबत कोणालाही सूट दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

