shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डब्ल्यूपीएल २०२६ गतविजेत्या मुंबई इंडियन्सची पराभवाने सुरुवात


                  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून सुरू झालेल्या वुमेन्स प्रिमीयर लिग (डब्ल्यूपीएल) च्या चौथ्या आवृत्ती सुरुवात नवी मुंबई स्थित डीवाय पाटील क्रिकेट स्टेडीयमवर शुक्रवारी मोठ्या दिमाखात रंगारंग सुरुवात झाली पण उदघाटनच्या सामन्याचा शेवटही तितकाच चित्तथरारक झाला. पहिल्या व तिसऱ्या सत्राचे विजेते मुंबई इंडियन्स व दुसऱ्या सत्राचे विजेते रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या दरम्यान झालेला हा सामना प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडून तर गेलाच शिवाय मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाप्रमाणे महिला संघानेही आपल्या नव्या सत्राची पराभवाने सुरुवात केली.
                  नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) गतविजेत्या मुंबई इंडियन्स (एमआय) ला तीन विकेट्सने हरवून स्वतःच्या नव्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, सजीवना सजना आणि निकोला केरी यांच्यातील ८२ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर, मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ बाद १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नादिन डी क्लार्कच्या नाबाद आणि सामना जिंकणाऱ्या ६३ धावांच्या जोरावर ७ बाद १५७ धावा करून सामना जिंकला.

                 विजयासाठीच्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धडाकेबाज सुरुवात केली, परंतु मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी झटपट विकेट्स घेऊन सामन्यात रंजकता आणली. परंतु, नॅडिन डी क्लार्कच्या शानदार नाबाद खेळीमुळे अखेर आरसीबीला विजय मिळाला. आरसीबीला पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिला धक्का बसला. जेव्हा ग्रेस हॅरिस (२५ धावा) नॅट सेव्हर-ब्रंटने झेलबाद झाली. त्यानंतर कर्णधार स्मृती मंधातना (१८ धावा) ३.५ व्या षटकात शबनीम इस्माइलच्या चेंडूवर बाद झाली. पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावल्याने आरसीबीवर दबाव निर्माण झाला. सातव्या षटकात दयालन हेमलता (७ धावा) हिला अमनजोत कौरने पायचित करून तिसरा धक्का दिला. त्यानंतर ७.१ व्या षटकात राधा यादवला (१ धाव) अमेलिया केरने बाद केले. आठव्या षटका अखेर चार विकेट्स कमी धावा पडल्याने असताना आरसीबी अडचणीत सापडली.

                 यष्टीरक्षक रिचा घोष (६ धावा) ने त्यानंतर डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिलाही ७.४ व्या षटकात निकोला केरीने बाद केले. ६५ धावांवर पाच विकेट्स कमी असल्याने आरसीबीचा पराभव जवळजवळ निश्चित वाटत होता. मधल्या फळीत अरुंधती रेड्डी (२० धावा) ने नॅडिन डी क्लार्कला चांगली साथ दिली, पण १६.१ षटकात निकोला केरीने तिला बाद केले. त्यानंतर १७ व्या षटकात श्रेयंका पाटील (१ धाव) कॅरीची दुसरी बळी ठरली. नॅडिन डी क्लार्कने एका टोकाला मजबूत पकड दिली आणि ४४ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. या डावात क्लार्कने सात चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या षटकात १८ धावांची गरज असताना, डी क्लार्कने नॅट सायव्हर-ब्रंटच्या गोलंदाजीवर दोन चौकार आणि दोन षटकार मारून आरसीबीचा सामना जिंकला.

                 आरसीबीला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात १८ धावांची आवश्यकता होती. फलंदाज होती नॅडिन डी क्लार्क, शेवटच्या षटकात पहिला चेंडू: डॉट बॉल गेला, दुसरा चेंडूही निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर षटकार बसला, चौथ्या चेंडूवर चार लागला, पाचवा चेंडू सहा धावांसाठी सिमापार गेला. सहाव्या चेंडूवर चौकार मारला. नादिन डी क्लार्कने शेवटच्या चार चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकार मारून सामना फिरवला.

                  तत्पूर्वी, मुंबईच्या डावाची सुरुवात संथ झाली. अमेलिया केर आणि जी. कमलिनी यांनी पहिल्या विकेटसाठी २१ धावांची भागीदारी केली. अमेलिया केरला डावाच्या पाचव्या षटकात लॉरेन बेलने फक्त ४ धावांवर बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेली नॅट सेव्हर-ब्रंट देखील फक्त ४ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. जी. कमलिनीला श्रेयंका पाटीलने ३२ धावांवर त्रिफळाबाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौर देखील मोठी खेळी खेळू शकली नाही, ती २० धावा करून बाद झाली. ६७ धावांवर चार गडी गमावल्यानंतर, मुंबईला एका मजबूत भागीदारीची आवश्यकता होती. त्यानंतर निकोला केरी आणि सजीवन सजना यांनी पाचव्या विकेटसाठी ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. केरीने ४०, तर सजना यांनी ४५ धावा केल्या. अमनजोत कौर आणि पूनम खेमनार या अखेर नाबाद राहिल्या. आरसीबीकडून नॅडिन डी क्लार्कने चार बळी घेतले, तर लॉरेन बेल आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

                  २५ नोव्हेंबरला याच मैदानावर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आपला पहिला आयसीसी करंडक जिंकला होता. मात्र या सामन्यात हरमनप्रीतच्या मुंबई इंडियन्स प्रथम ग्रासे मक्षिपःत झाला. तर स्मृती मंधानाच्या संघाने मात्र विजयाने सुरुवात केली. मुंबईला आपले पुढील सर्व सामने जिंकण्याचे कठीण कार्य करावेच लागेल अन्यथा त्यांना आपले गतजेतेपद राखणे मुश्किल होईल.


@डॉ.दत्ता विघावे                    
    क्रिकेट समिक्षक 
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close