अहिल्यानगर (नव नागापूर) प्रतिनिधी:
देशसेवा बजावून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या 'वीर सैनिक बहुउदेशीय संस्था' नव नागापूरचा प्रथम वर्धापन दिन आणि आझाद हिंद फौजेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२९ वी जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.या निमित्ताने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
*रक्तदानातून सामाजिक बांधिलकी:
कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून संघटनेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये माजी सैनिक, युवक आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाचा संकल्प पूर्ण केला.
*मान्यवरांची मांदियाळी:
कार्यक्रमाला एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माणिकराव चौधरी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून सैनिकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी नव नागापूरचे सरपंच बबनराव डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब (बंडू नाना) सप्रे, सागरभाऊ सप्रे,गोरख गव्हाणे, भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ घाडगे, उद्योजक अशोक शेळके, वडगांवचे सरपंच शेवाळे साहेब, लेबर कॉन्ट्रॅक्टर दत्ता साहेब चौरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
*शहीद स्मारकासाठी ग्रामपंचायतीचा मोठा हातभार:
संस्थेच्या वतीने परिसरामध्ये स्वखर्चातून 'सैनिक स्मारक' उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या कार्याची दखल घेत नव नागापूर ग्रामपंचायतीने स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल संघटनेच्या वतीने सरपंच आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांचे जाहीर आभार मानण्यात आले.
*अध्यक्षांचे आवाहन
"आम्ही देशासाठी लढलो, आता समाजासाठी आणि भावी पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हे स्मारक उभारत आहोत," असे सांगत संघटनेचे अध्यक्ष मेजर बाबासाहेब तेलोरे यांनी सर्व ग्रामस्थांना या स्मारकाच्या उभारणीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर

