न्यूझीलंडविरूध्द तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका घरच्या मैदानावर गमावण्याची नामुष्की सहन करावी लागल्यानंतर काहीशा वेगळ्या खेळाडूंचा संघ घेऊन टी २० मालिकेसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने पाहुण्या किवीजचा सहज पराभव करून मागच्या पराभवावर मलमपट्टी केली. वनडे मालिकेतही पहिला सामना भारताने जिंकला होता, मात्र त्यानंतरचे दोन्ही सामने गमावल्यामुळे मालिका हातून निसटली. मात्र टी२० मालिकेत असं काही घडू नये याची काळजी टीम इंडियाला घ्यावी लागेलच. कारण या मालिकेनंतर लगेच विश्वचषक स्पर्धा असल्याने संघाला विजयी मानसिकता घेऊनच त्यात उतरणे संघाच्या पुढील मार्गक्रमणासाठी फायदेशीर ठरेल.
बुधवारी नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत ४८ धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह, भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु ही चाल त्याच्यावरच उलटली.
प्रथम फलंदाजी करताना, भारताने अभिषेक शर्माच्या स्फोटक ८४ आणि रिंकू सिंगच्या नाबाद ४४ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकांत २३८ धावांचा मोठा आकडा उभा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला ७ बाद १९० धावाच करता आल्या.
विजयासाठीच्या २३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने डेव्हॉन कॉनवेला बाद केले. दुसऱ्या षटकात हार्दिक पंड्याने फक्त १ धावा काढणाऱ्या रचिन रवींद्रला बाद केले. फक्त १ धावेत दोन गडी गमावल्यानंतर किवी संघ दबावाखाली होता. त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि रॉबिन्सन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तथापि, वरुण चक्रवर्तीने सातव्या षटकात रॉबिन्सनला बाद करून ही भागीदारी तोडली. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ५२ अशी झाली.
तरीही ग्लेन फिलिप्सने आक्रमक खेळी सुरूच ठेवली, त्याने ४० चेंडूत ७८ धावा केल्या, परंतु १४ व्या षटकात तो बाद झाला. त्यानंतर मार्क चॅपमनने डावाची जबाबदारी स्वीकारली, त्याने ३९ धावा केल्या असता पंधराव्या षटकात वरुणने त्याला त्याच्या फिरकीत अडकवले. चॅपमन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी ३१ चेंडूत ९६ धावांची आवश्यकता होती, जी त्यांच्यासाठी कठीण ठरली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात संजू सॅमसन १० धावांवर बाद झाला. दीर्घ विश्रांतीनंतर टी-२० क्रिकेटमध्ये परतणारा इशान किशनही फक्त ८ धावांवर बाद झाला. यानंतर, दुसरा सलामीवीर अभिषेक शर्माने सामन्याचा नूरच बदलवला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आणि फक्त २२ चेंडूत अर्धशतक झळकविले. कर्णधार सूर्यकुमार यादवही बऱ्याच दिवसानंतर फॉर्मात दिसत होता. भारताची १० षटकात २ बाद ११७ अशी धावसंख्या होती.
परंतु अकराव्या षटकात भारताला तिसरा धक्का बसला जेव्हा सूर्यकुमार यादव २२ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. बाराव्या षटकात अभिषेक शर्मा ३५ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८४ धावांची स्फोटक खेळी खेळून बाद झाला. यानंतर गडी बाद होणे सुरूच राहिले. चौदाव्या षटकात शिवम दुबे ९ धावा करून बाद झाला, तर सोळाव्या षटकात हार्दिक पंड्या २५ धावांवर परतला. शेवटी रिंकू सिंगने २० चेंडूत नाबाद ४४ धावांची शानदार खेळी खेळली, त्यामुळेच भारताला २३८ धावांची मजबूत इमारत उभी करता आली.
स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने एक अशी खेळी केली, त्याने त्याचाच गुरू युवराज सिंगचा जुना विक्रम मोडला. न्यूझीलंडविरुद्ध नवीन वर्षाची सुरुवात करताना, अभिषेकने त्याच्या पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम मोडले आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या युवराज सिंगला मागे टाकले. या सामन्यापूर्वी, अभिषेक शर्माला युवराज सिंगचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडण्यासाठी फक्त तीन षटकारांची आवश्यकता होती. त्याने पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ख्रिश्चन क्लार्कचा चेंडू स्टँडमध्ये टाकून युवराज सिंगचा विक्रम मोडला.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, युवराज सिंगने सन २००७ ते २०१७ दरम्यान ५८ सामन्यांमध्ये ५१ डावात ७४ षटकार मारले. या काळात, युवराजने १,१७७ धावा आणि आठ अर्धशतके केली. आता अभिषेक शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. आता या प्रारूपात त्याच्या नावावर एकूण ८१ षटकार आहेत. अभिषेक शर्माने धावांच्या बाबतीतही युवराज सिंगलाही मागे टाकले आहे, षटकारांसह. युवराजने ५१ डावात ११७७ धावा केल्या असताना, अभिषेकने फक्त ३३ डावात ११९८ धावा केल्या आहेत.
या सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला. न्यूझीलंडच्या डावा दरम्यान गोलंदाजी करताना अक्षर पटेलला दुखापत झाली, ज्यामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली. न्यूझीलंडच्या डावाच्या १६ व्या षटकात अक्षर पटेलला ही दुखापत झाली. या षटकात तो गोलंदाजी करण्यासाठी आला आणि पहिल्या दोन चेंडूत त्याने फक्त ३ धावा दिल्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल लेग स्टंपच्या बाहेर पडला आणि एका लहान, फुलर चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थेट गोलंदाजाच्या वरून गेला. अक्षर पटेलने चेंडू थांबवण्यासाठी आपला डावा हात पुढे केला, परंतु चेंडू त्याच्या बोटाला जोरात लागला
अक्षर पटेलला फटका बसताच तो वेदनेने ओरडताना दिसला. कॅमेऱ्यांनी स्पष्टपणे दाखवले की, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. संघाचे फिजिओ ताबडतोब मैदानावर आले आणि त्यांनी अक्षरच्या बोटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे पाहिले. परिस्थिती पाहता, अक्षर पटेलला उपचारासाठी मैदानाबाहेर नेण्यात आले. अक्षर मैदानाबाहेर गेल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माकडे चेंडू सोपवला व सोळावे षटक पूर्ण झाले.
अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे आणि त्यात अक्षर पटेलचे नाव समाविष्ट आहे. आता, अक्षरच्या दुखापतीची तीव्रता, त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी किती वेळ लागेल आणि तो विश्वचषकापूर्वी परत येऊ शकेल का यावर सर्वांचे लक्ष आहे. टी-२० विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. शेवटच्या वनडेत आणखी एक अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला होता, शिवाय प्रमुख फलंदाज तिलक वर्माही ऑपरेशन झाल्याने संघाबाहेर असल्याने टिम इंडियाच्या गोटात चिंता वाढली आहे.
एकंदर पहिला सामना जिंकून भारताने सुरुवात तर चांगली केली, मात्र हाच टेंपो ते पुढे कसा नेतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे. संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे यांनाही आपल्या खेळात सुधारणा करून विकेट फेकण्याच्या सवयीवर लगाम घालावा लागेल. न्यूझीलंड नेहमीच भारताला त्रासदायक ठरत असल्याने डोळ्यात तेल घालून कामगिरी उंचावण्याची जबाबदारी सुर्या आणि कंपनीवर आली आहे असे म्हणणे वावगे ठरू नये.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

